महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? शरद पवार म्हणाले…
पुणे – शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आणि आणि पुन्हा एकदा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद स्विकारलं. या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर शरद पवार यांनी पहिल्यांदा टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. त्यांनी राजीनाम्यापासून ते कर्नाटक निवडणुकीवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, काँग्रेस आमदार नाना पटोले हे दोघे सातत्याने महाविकास आघाडी आणि आगामी मुख्यमंत्री यावर वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीत ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी शरद पवार यांना नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता. शरद पवार म्हणाले, साधारणपणे तसंच असतं. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. यात फारसं काही चुकीचं नाही. परंतु आमची (महाविकास आघाडीची) याबाबत अशी काही चर्चा झालेली नाही. ते त्यांचं (नाना पटोले) व्यक्तिगत मत आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत हे मत मांडायला काही हरकत नाही.
सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा?
शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं. त्यावर शरद पवार बोलते झाले. “आता सांगता येत नाही.पण जबाबदारी घेण्याची पण तयारी पाहिजे. सुप्रिया सुळेंचे सध्या बारामतीवर लक्ष आहे. निवडणूक संपल्यावर शांतपणे निर्णय घेऊ”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अलिकडेच म्हणाले होते की, “महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असणार आहे, हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तितक्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. त्यामुळेच मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो”. जयंत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, “जयंत पाटील यांनी कोणत्या समीकरणांच्या आधारावर हे वक्तव्य केलं हे मला माहिती नाही. ज्यांच्या आमदारांची संख्या जास्त असते, त्यांचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे सध्या काँग्रेस पक्षाला यावर चर्चा करायची नाही”.
कर्नाटक निवडणूक
कर्नाटकात सध्या निवडणूक होतेय. तिथं प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बली की जय म्हणत मतदान करा, असं म्हटलं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन अशा पद्धतीने घोषणा देतात हे योग्य नाहीये, असं शरद पवार म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असं सध्या दिसत आहे. केरळ, तेलंगणा, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, बंगालमध्ये या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. जास्तीत जास्त 5 ते 6 राज्यात भाजपची सत्ता आहे. बाकीच्या सगळ्या ठिकाणी नॉन भाजप सरकार आहेत. लोकसभेत काय होईल हे माहीत नाही कारण लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील का माहीत नाही, असं शरद पवार म्हणालेत.