श्री शिवाजी महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उदघाटन

0 97

परभणी – येथील श्री शिवाजी महाविद्यालय आणि कौशल्य आणि उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने कॉन्फरन्सिंग पद्धतीने कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

सदरील विभागाचे मंत्री मंगलप्रसाद लोढा, महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राच्या उपायुक्त निधी चौधरी,जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुमित दीक्षित, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्रातील शंभर महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले.

 

 

उदघाटकीय मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महासत्ता होण्याकरिता मानव संसाधनाची गरज असते. त्याशिवाय कुठलाही देश प्रगती करू शकत नाही. आजच्या युवा पिढीला शिक्षण प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाची गरज लक्षात घेऊन या कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे याचा फायदा तरुणांनी घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

 

संबंधित खात्याचे मंत्री मंगलप्रसाद लोढा म्हणाले, कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यधिष्टीत करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार महाराष्ट्रातल्या शंभर महाविद्यालयांना या केंद्राची सुरुवात होत आहे. येणाऱ्या काळात होऊ घातलेले बदल लक्षात घेता हे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार क्षमतेमध्ये वृद्धी, स्किल गॅप नुसार कौशल्य प्रशिक्षण, वंचित गरजू विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण, औद्योगिक आस्थापनांच्या गरजेनुसार प्रशिक्षण व जागतिक स्पर्धात्मक तयारीसाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अवलंब ही उद्दिष्टसमोर ठेऊन या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी नमूद केले.

 

 

प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी यावेळी कौशल्य विकास विभागाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या माध्यमातून आपण स्वयंपूर्ण कसे बनू शकतो तसेच हे घटक स्वावलंबी बनवण्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या मनोगतातून दिली.

 

 

यावेळी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग-प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. प्रशांत विभुते, अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक प्रा. मयूर टाक, प्रा. अभिजित भंडारी, तंत्र सहायक प्रा. सुर्वे तसेच प्राध्यापकांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत विभूते यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

error: Content is protected !!