अंतरवाली सराटी येथे होणार सकल मराठा समाजाची महत्त्वाची निर्णायक महा बैठक
परभणी,दि 19 ः
अंतरवाली सराटी येथे सकल मराठा समाजाची महत्त्वाची निर्णायक महा बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने परभणीत मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलन सुरू आहे, परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत असून सध्या निवडणुकीची आचारसंहिता देखील लागली आहे. त्यामुळे सध्या कोणताही निर्णय देखील घेतला जाणार नसल्याने लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची काय भूमिका याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी 24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यभरातून उपस्थित राहणाऱ्या मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी सकल मराठा समाज मदत केंद्र येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी जेष्ठ नेते सुभाष दादा जावळे, समीर दुधगावकर, प्रा. व्यंकटेश काळे, नितीन देशमुख,सोनाली देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी जावळे यांनी सांगितले की, राज्य सरकार दडपशाही करत आहे, आंदोलकांवर दाखल करत असून सरकारच्या वतीने आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी श्री. जावळे यांनी केला. जनतेने स्फूर्तीने राजकीय नेत्यांना घरबंदी करण्याचे अनोखे आंदोलन सुरू केल्याचे देखील जावळे यांनी सांगितले आहे तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये कोणती भूमिका यासाठी 24 मार्च बैठकीला प्रत्येक गावातून दोन प्रतिनिधी जाणार आहेत हे शक्तिप्रदर्शन नसून निर्णय बैठक आहे असे जावळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना समीर दुधगावकर म्हणाले, सरकारकडून मनोज जरांगे पाटील व मराठा समाजावर अन्याय केला जात असुन गुन्हे दाखल करुन दडपशाही केली जात असल्याचा आरोप करत समीर दुधगावकर यांनी निषेध व्यक्त केला.