विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या बळावर यशाची शिखरे पादाक्रांत करावीत-प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव
परभणी,दि 12 (प्रतिनिधी)ः
विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून दिल्या जाणारे शिक्षण, शिस्त आणि संस्काराच्या बळावर आपल्याला मिळालेल्या संधीचे सोनं करून मेहनतीच्या माध्यमातून यश मिळवावे असे मत प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात सोमवारी (दि.१२) रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, समन्वयक डॉ.तुकाराम फिसफिसे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.जाधव पुढे म्हणाले, विद्यार्थी जीवनात सातत्य आवश्यक आहे. महाविद्यालयातील समृद्ध ग्रंथालय, विविध विभागांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाची शिदोरी घेत आपले ध्येय गाठावे. महाविद्यालय हे संस्काराचे केंद्र आहे. समाजशील माणूस होण्यासाठी महाविद्यालयातील या गुणांचा फायदा विद्यार्थीदशेत घेत यश संपादन करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ.केशट्टी म्हणाले, येणारा काळ प्रचंड स्पर्धेचा आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करण्याची सवय असणे गरजेचे आहे. जिद्द आणि चिकाटीने विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.उपप्राचार्य डॉ. नितोंडे म्हणाले, यावर्षीचे विद्यार्थी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी प्राप्त करतील. बहुआयामी असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा विकास बहुआयामी ज्ञान प्राप्त करतील. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून आपले यश संपादन करावे जेणेकरून अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला पर्याय उपलब्ध राहतील असे मत मांडले.
यावेळी नुकतीच पीएसआय झालेली अलका भोसले-मस्के तसेच कर निर्धारण अधिकारी झालेली श्रद्धा चोखट यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दोघीनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागांची ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तुकाराम फिसफिसे, सूत्रसंचालन डॉ. जयंत बोबडे तर आभार डॉ.प्रशांत सराफ यांनी मानले. यावेळी कला, वाणिज्य तसेच विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.