एकही आरोपी सुटला तर राज्य बंद करू-मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आजा धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंस सोनवणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक आमदार स्थानिक लोकप्रतिनीधींनी आक्रमक भाषण करत आपली भूमिका मांडली. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी खासदारांनी केली. तर, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. या मोर्चात सर्वात शेवटी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, पोलीस प्रशासनाने खुनातील आरोपींविरुद्ध मोक्का लावला आहे. पण, खंडणीच्या आरोपीवर मोक्का नसेल तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, पोलिसांकडून आज 7 आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती आहे.
आपल्याला न्याय मिळेपर्यंत उन, वारा पाऊस सहन करायचा डगमगायच नाही. माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबाच्या वेदना जास्त महत्वाच्या आहेत. सगळ्या आरोपी विरुद्ध मकोका लागला अशी माहिती आली. मात्र, खंडणीतील आरोपी विरोधात मोक्का लागला नसेल तर आम्हाला तो मान्य नाही. खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत, सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी मोर्चातून केली. खंडणी आणि खुनाचे आरोपी एकाच आहेत, सर्वांना 302 मध्ये घ्या. एकही आरोपी सुटला तर आम्ही हे राज्य बंद पाडू. जर पदावरून हटवलं नाही तर दिवसा लोकं मारेल असं धस म्हणाले, पण अण्णा आता जरं नख लागला तर कुत्र्यासारखे सालपट काढू, दगफटका केला तर सरकारचा कार्यक्रम झालाच, असे म्हणत मनोज जरांगे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंना आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे.
धनंजय मुंडेंना इशारा
मनोज जरांगे यांनी धाराशिव जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत गृहमंत्री व धनंजय मुंडेना लक्ष्य केलं. धनंजय मुंडे हा मनोज जरांगे भीत नसतो, तुझ्या गुंडाना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारी नंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. दरम्यान, बीड सरपंच हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्वच आरोपींवर आज पोलीस प्रशासनाकडून मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध आज मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्यमंत्री-गृहमंत्री आपण जागे आहात काय? काय चाललंय राज्यात?
जरांगे म्हणाले, धाराशिवमधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर बलात्कार झाला आहे. मला धाराशिवमध्ये आल्यावर ही घटना कळली. ही हरामखोर अवलाद सरकारच्या लेकीवरती अन्याय करत आहे आणि सरकार म्हणून तुम्ही काहीच करत नाही. आम्ही सरकारवर थुंकतो… मुख्यमंत्री-गृहमंत्री आपण जागे आहात काय? काय चाललंय राज्यात… अशी विचारणा जरांगे यांनी केली.
हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर राज्य बंद करू
मुख्यमंत्री फडणवीस साहेब, या समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवलाय. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मकोका लागेल आणि कुणीही आरोपी सुटणार नाही, असा तुम्ही कुटुंबियांना शब्द दिलाय. जर दगाफटका केला तर तुमच्या सरकारचा कार्यक्रम केलाच म्हणून समजा. या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर राज्य बंद करू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. तसेच आरोपी जर सुटले तर सत्ताधाऱ्यांच्या मी मागे लागेन, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितले.