भारतीय संविधानामुळेच देशात एकता व अखंडता कायम-प्रा.डॉ.रमेश शिंदे
परभणी,दि 22 ः
भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असून भारतात धर्म,जाती,पंथ,भाषा, प्रांत इत्यादी बाबतीत मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते पण या विविधतेतून एकता साधण्याचे व देशाचे सार्वभौमत्व टिकवून देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य भारतीय संविधान करते असे विचार प्रा.डॉ. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.
परभणी येथील ज्योतिर्गमया इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रिया ठाकूर या होत्या . या प्रसंगी व्यासपीठावर श्रीमती बनश्री सूर्यवंशी, श्री अमोल पंडितकर यांची उपस्थिती लाभली. पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की संविधानकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील अनेक राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून अतिशय परिश्रमपूर्वक सर्वव्यापी असे लिखित संविधान देशवासीयांना अर्पण केले. संविधानामुळे देशात स्वातंत्र्य,समता, बंधुत्व ही मूल्य रुजवली जातात. त्याचबरोबर अधिकाराबरोबरच कर्तव्याची जाणीव देखील नागरिकांना करून दिली जाते. संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे.घर घर संविधान या उपक्रमाच्या माध्यमातून हा राष्ट्रीय ग्रंथ घरोघरी पोहोचला पाहिजे आणि तो प्रत्येकाने वाचला पाहिजे. तिरंगा झेंडा, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह यांच्याप्रमाणेच संविधानाचा देखील सन्मान झाला पाहिजे. प्रत्येक शाळा महाविद्यालयातून संविधान उद्देशिकेचे वाचन झाले पाहिजे. संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना संविधानिक मूल्यांची जपवणूक करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे ते पुढे म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका गाडेकर यांनी केले तर आभार जितेंद्र कलाप्पा यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी,शिक्षक, पालकांची उपस्थिती लाभली.