कलागुणांमुळे आपले जगणे समृद्ध होते-प्रा.डॉ.जयंत बोबडे
भारतीय बालविद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन थाटात संपन्न
परभणी – बदलत्या काळासोबत आपले जगणे बदलून गेले आहे. अशावेळी आयुष्यात अपयश आले तर ते पचवण्याची क्षमता असली पाहिजे. ज्यांच्या अंगी कलागुण असतात ते अपयश पचवून यशाची शिखरे पादाक्रांत करतात ज्यामुळे आपले जगणे समृद्ध होते असे प्रतिपादन प्रा.डॉ.जयंत बोबडे यांनी बुधवार (२३) रोजी केले.
शहरातील ममतानगर भागातील भारतीय बालविद्या मंदिर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव रामबिलासजी मुंदडा उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीरामजी कालानी, संचालक महेश सोमाणी , राजेश सिंघवी,सुशील कुचेरीया, प्रीतम अबोटी, प्रभारी मुख्याध्यापक नारायण आळंदकर,प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी कुरुडे, ममतानगर शाखा विभागप्रमुख डी. आर. सुक्ते, प्रभावतीनगर शाखा विभागप्रमुख बबन शेंडगे, रायझिंग सनच्या मुख्याध्यापिका अनुपमा झिंगरे यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.बोबडे पुढे म्हणाले, भारतीय बालविद्या मंदिरला गुणवत्तेची गौरवशाली परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत शिक्षकांच्या सूचनांचे गांभीर्याने पालन केले तर नक्कीच यश मिळते. विद्यार्थ्यांना यश मिळवायचे असेल तर पालकासह त्यांनी मोबाईलपासून दूर राहिले पाहिजे. काळ झपाट्याने बदलत चालला आहे, अशावेळी पालक-गुरुजनांच्या मार्गदर्शनाच्या बळावर यश मिळवून आपले आई-वडील, शिक्षक आणि देशाचे नाव मोठं करावं असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून झाली. स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाच्या नंतर विविध गीतांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण नृत्य, नाटिका सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कुमावत, दीक्षा सरवदे, एस.एल.देशमुख यांनी तर आभार डी. आर.सुक्ते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.