मुंबईत महिलेची 202500000 रुपयांची फसवणूक
मुंबई – मुंबईतील या 86 वर्षीय वृद्ध महिला सायबर फसवणूक आणि डिजिटल अटक घोटाळ्याची बळी पडली आहे. या प्रकरणात थोडीथोडकी नाही तर तब्बल २० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील ८६ वर्षीय महिला या घोटाळ्याला बळी पडली आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत बातमी दिली आहे.
सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित वृद्ध महिलेला फोन केला होता. आधार कार्डचा अवैध कामासाठी वापर झाल्याचे सांगून पीडितेच्या खात्यामधील पैसे विविध बँक खात्यात वळवून घेण्यात आले.
२६ डिसेंबर २०२४ ते ३ मार्च २०२५ या काळात सदर घोटाळा झाला असून या काळात आरोपींनी एकूण २०.२५ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर पोलीस शाखेने दोन जणांना अटक केली आहे.
संपूर्ण घोटाळा सुरू करणाऱ्या सुरुवातीच्या कॉलमध्ये, कॉलरने पीडितेला सांगितले की, तिचे आधार कार्ड आणि इतर वैयक्तिक माहिती भारतात नवीन बँक खाते उघडण्यासाठी वापरली गेली आहे. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून कॉलरने सांगितले की संबंधित खात्याचा वापर मनी लाँड्रिंगसह अनेक बेकायदेशीर कामांशी संबंधित पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जात आहे.
स्टेज सेट झाल्यानंतर, स्कॅमर्सनी त्यांच्या योजनेचा पुढचा टप्पा सुरू केला आणि त्यानंतर धमकी आली. फोन करणाऱ्याने सांगितले की, तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगून की या प्रकरणात तिचे आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव सामील होईल, ज्यामध्ये तिची मुलगी देखील समाविष्ट असेल. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी, तिला अनेक बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले.
घोटाळा सुरू असताना, घोटाळेबाजांनी पीडितेला ‘डिजिटल अटक’मध्ये राहण्याचे निर्देश दिले. यामुळे महिलेला माहिती कोणालाही सांगता आली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी मंचावर याची तक्रार केली. सायबर पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता विविध बँक खात्यात पैसे वळते केल्याचे लक्षात आले. यावेळी शायन जमील शेखच्या खात्यातही काही पैसे वळते केल्याचे लक्षात आले. त्याच्या खात्यात ४.९९ लाख रुपये पाठवले गेले आहेत. शायनचा शोध घेऊन अटक केल्यानंतर त्याला फसवणुकीतील पैसे मिळाल्याचे त्याने मान्य केले.शायन शेखकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राजीक आझम बटला ताब्यात घेतले. यावेळी आणखी एक आरोपी रायन अर्शद शेख फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.