खेर्डा येथे प पू भानुदास महाराजांचा जन्मोत्सव साजरा

0 57

सेलू ( नारायण पाटील )
प पू भानुदास महाराज यांचा जन्मोस्तव त्यांच्या जन्मगावी तालुक्यातील खेर्डा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . दि १२ ते १९ मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या या जन्मोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
साडेगाव येथील श्रीराम संस्थान चे मठाधिपती प पू सुरेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत येथील हनुमान मंदिर मध्ये आयोजित सोहळ्यात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा ,७ ते १० सामूहिक दासबोध पारायण ,दुपारी २ ते ५ या वेळेत ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांच्या रसाळ व अमृततुल्य वाणीमधून शिवमहापुराण ज्ञानयज्ञ सोहळा ,सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व जागर कार्यक्रम घेण्यात आले .
यामध्ये दि १६ मार्च रोजी श्री श्री १००८ आचार्य स्वामी हरिचौत्यानानंद सारस्वतीजी महाराज ,१३ मार्च रोजी ह भ प सुरेश महाराज रनेर ( गोविंदपूरवाडी ) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते . यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प पु सुरेश महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती .यावेळी मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी दोन्ही बाजूनी रांगोळ्या काढून सजावट केली होती .तसेच जागोजागी सुवासींनीच्या वतीने महाराजांचे औक्षण करण्यात आले .
सामूहिक दासबोध पारायण सोहळ्यात गावातील जवळपास ४० महिलांनी सहभाग घेतला होता .

आज १९ मार्च प पू भानुदास महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन झाले .दुपारी १२ वाजता भानुदास महाराजांचा जन्मोत्सव गुलाबांच्या पाकळ्या उधळून व गजर करून करण्यात आला .यावेळी प पू सुरेश महाराजावर देखील साडेगाव ग्रामस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली .तसेच दासबोध पारायनासाठी बसलेल्या सर्व महिलांना सुरेश महाराजांच्या हस्ते प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात आले .आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .या महाप्रसादाचे प्रायोजक जी प प्रशाळेतील शिक्षक अशोक गिरी ,धर्मकुमार वानरे व संजय बिराजदार हे होते .यावेळी गावकऱ्यांसह हजारो उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

error: Content is protected !!