रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

0 84

मुंबई : सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा नोंद केलाय. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्याचा विचार करता तब्बल १०४१ जणांवर तर बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वत: मनोज जरांगे यांच्यावर शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, असे वारंवार आवाहन केलेल्या जरांगे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झालीये.
राज्य सरकार सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी रास्ता रोको करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले. तसा कार्यक्रमही त्यांनी मराठा समाजबांधवांना दिला. जरांगे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

भाजप आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत भाजप आमदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. आपण मराठा समाजाच्या पाठिशी आहोत, ही बाब आपापल्या मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. मनोज जरांगे पाटील वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमाने हाताळला पाहिजे.  भाजप मराठा समाजाच्या पाठिशी राहणार आहे. यापूर्वीही भाजप सरकारनेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. आतादेखील नव्याने दिलेले आरक्षण कोर्टात टिकेल, हा विश्वास लोकांना द्या, अशी सूचना भाजप आमदारांना करण्यात आली आहे.  तसेच या बैठकीत भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर द्या, असेही भाजप आमदारांना सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!