आका ३०२ मध्ये देखील आहे..आ.सुरेश धसांनी सगळच सांगीतल
: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं. दरम्यान बीडचे आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असं म्हटलं आहे. तसंच बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे असंही म्हटलं आहे.
मी आकाला घाबरत नाही-सुरेश धस
“बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही” मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं असंही धस खोचकपणे म्हणाले. “आकाला मी घाबरत नाही. ९ तारखेला घटना घडली आणि आका त्याच परिसरात होता. आका ३०२ मध्ये देखील आहे. आका सध्या रिसॉर्ट बांधत आहे. शेतकऱ्यांना धमकी देऊन काम सुरू आहे” असा आरोप सुरेश धस यांनी केला. “परळी येथील दुबे प्रकरणात देखील आका आहेत. किती लाखात मिटले मला माहीत आहे. पीडित लोक माझ्याकडे येणार आहेत” असं सुरेश धस यांनी सांगितलं.
रामशे बंधुचा हिरो की निर्माता हिंडला म्हणून विलासराव देशमुखांचे मुख्यमंत्रीपद गेलं. मुलीचे मार्क वाढवल्यामुळे निलंगेकर पाटील यांचे मुख्यमंत्रीपद गेलं, आर. आर. पाटील यांनी बडे बडे शहरो मे छोटी छोटी घटना असं काहीतरी वक्तव्य केल्याने डायरेक्ट मुंबईवरून अंजनीला पाठवलं. १२ डिसेंबरला माजी पालकमंत्री कोणत्या भाषेत बोलले. त्या क्लिप का फिरवत नाहीत? संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिंग, मर्डर होत नाहीत का? म्हणजे तुम्ही समर्थन देत आहात का? बॉडी लँग्वेजवर काहीच का बोलले नाही गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेल्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेलं ते बघा. त्याच्यामध्येही स्टाईलमध्ये चष्मा ढकलत आहेत, असं म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले सुरेश धस?
“संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना १५ दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्याची संधी आता मिळेल. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांची सही झाली. आयजींच्या दर्जाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि घाणेरड्या घटनेचा तपास करणार आहेत. याची न्यायालयीन चौकशी होईल” असं बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस म्हणाले. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलय. प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. कोणाला ही घटना पटलेली नाही. मला वाटतं काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली आहे. काही निर्णय झालेत. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे” असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं.