खातेवाटपाचा तिढा जैसे थे! अजित पवार दिल्लीला रवाना

0 121

मुंबई:
गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबण्याची शक्यता आहे. हा विस्तार बुधवारी सायंकाळी होण्याची शक्यता होती. पण अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट काही महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसला आहे. त्यामुळे शिंदे – फडणीसांची मोठी गोची झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार बुधवारी सायंकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम मंत्रिमंडळ विस्तार करा आणि नंतर योग्यवेळी खातेवाटप करु, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपाची चर्चा सुरु झाली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये मुख्ममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन मॅरेथॉन बैठका झाल्या आहेत. वर्षा बंगल्यावर रात्रीच्यावेळी हे तिन्ही नेते बराच काळ राजकीय खलबतं करत होते. मात्र, खातेवाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. अजित पवार यांचा गट महसूल, अर्थ आणि जलसंपदा या तीन खात्यांसाठी अडून बसला आहे. महसूल खाते हे सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे. तर अर्थ आणि जलसंपदा ही दोन्ही खाती सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. मात्र, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा तीव्र विरोध आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी त्यांच्या गटाच्या आमदारांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. आता अर्थखाते पुन्हा अजित पवार यांच्याकडेच गेल्यास ते पूर्वीप्रमाणेच कारभार करू शकतात, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यावर काय तोडगा निघणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या समावेशामुळे शिवसेना-भाजपमध्ये अस्वस्थता

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं परंतु अद्याप शिवसेना आणि भाजपचे आमदार मंत्रिमंडळात सामील होण्याची वाट पाहत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. शिंदे यांच्यासमवेत आमदारांची मागील आठवड्यात बैठक झाली. त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला आलेली खाती राष्ट्रवादीसाठी सोडू नये, अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यावर भाजपने मान्य केलेली आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांपैकी कोणतंही खाते राष्ट्रवादीला दिलं जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होतं.

शिंदे-फडणवीसही दिल्लीत जाणार

अजित पवार दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिवसेनेची असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये अमित शाह यांना यश मिळतं का? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

error: Content is protected !!