अफाट जनसमुदायाच्या साक्षीने राजेश विटेकरांसाठी अजितदादांनी घेतली विजयी संकल्प सभा

0 121
परभणी,दि 13 ः
पाथरी,मानवत,सोनपेठ,परभणी ग्रामीण या भागाचा कायापालट करायचा  आहे त्यामुळे राजेश विटेकर हे विधानसभेत जाणे गरजेचे आहे.तुम्ही संधी द्या मी सोन करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानवत येथे मतदारांना साद घातली.अफाट जनसमुदायाच्या साक्षीने विटेकर यांच्या विजयासाठी विजयी संकल्प सभा पार पडली.

पाथरी विधानसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार आमदार राजेश विटेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी (दि.13) मानवत शहरात सभा झाली.यावेळी  ते बोलत होते. यावेळी उमेदवार विटेकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. या सभेत दादासाहेब टेंगसे, संजयराव रनेर यांनी राष्ट्रवादीत  प्रवेश केला.

पुढे बोलताना अजित  पवार यांनी सांगीतले, राजकारण असो समाजकारणात आपण शब्दास कटिबध्द राहिलो आहोत. गेल्या लोकसभा निवडणूकीत रासपला जागा सोडतेवेळी राजेश विटेकर यांना थांबण्याचा सल्ला दिला. पाठोपाठ सहा महिन्यात आमदार करु, असा शब्द दिला. तीन महिन्याच्या आत तो शब्द पाळला, असे नमूद केले.
 या विधानसभा निवडणूकीतून विटेकर यांना सन्मानाने विधानसभेवर पाठवा, असे आवाहन करतेवेळी या मतदारसंघाच्या विकासात्मक वाटचालीकरीता विटेकर हे निवडून येणे नितांत गरजेचे आहे, असे स्पष्ट केले. परभणी जिल्हा विकासात्मक कामात खूप मागे राहिला आहे. निष्क्रिय लोकप्रतिनिधींची परंपरा त्यास कारणीभूत आहे. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी विकास कामांना कधीच प्राधान्य दिले नाही. मूळात त्यांच्यातच ती दृष्टी कधी दिसलीच नाही. विकास योजना राबविण्याकरीता मोठी धमक, ताकद असावी लागते. तरच कामे होतात. ज्यांच्या अंगातच पाणी नाही, ते तुम्हाला काय देणार असा सवाल करतेवेळी पवार यांनी आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला विकास काय असतो, तो करुन दाखवू, आमच्यात रग आहे. आमच्यात हिम्मत आहे. प्रशासनावर आमची पकड आहे. त्यामुळे सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने जे काही करता येईल ते निश्चितपणे करु, असा विश्वास व्यक्त केला. पाथरीकरांनो, साथ द्या पुढील पाच वर्षात या मतदारसंघात 4 हजार कोटींची विकास कामे करु, असे आश्वासन देतेवेळी पवार यांनी या मतदारसंघांतर्गत गोदावरी दुधना सहकारी साखर कारखान्या पुनर्जीवनाकरीता आपण प्रयत्न करु, या कारखान्याची गाळप क्षमता वाढवू, तसेच ऊस उत्पादकांना दिलासा मिळावा या दृष्टीने स्वतः प्रतिष्ठा पणास लावू, असा विश्वासही व्यक्त केला. संत साईबाबा यांच्या या भुमीच्या विकास आराखड्याकरीता आपण अर्थमंत्री या नात्यातून पैसा देवू, पाथरीचा कायापालट करु, तीर्थक्षेत्र नृसिंह पोखर्णीस पर्यटनाचा दर्जा देवू, तसेच पैठणच्या जलाशयातून लाभ क्षेत्रापासून कोसोदूर राहणार्या 54 गावांना सिंचनाकरीता पाणी उपलब्ध करुन देवू, गोदावरी नदीवरील बंधार्याच्या पाण्यातून पिण्यासह सिंचनाचे प्रश्न मिटवू, तसेच पाथरी मतदारसंघांतर्गत रस्ते, भूमिगत गटारे व अन्य विकास कामे मार्गी लावू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!