‘अजितदादा तुमच्यात धमक असेल, तर आता….संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमध्ये आज सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनीही या प्रकरणावर बोलताना धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ”संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा मी महाराष्ट्रात नव्हतो. राज्यात आल्यानंतर सर्वात आधी मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यांच्या भावाने मला एक फोटो दाखवला. ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आलं होतं, ते बघून राहावलं नाही. हा आपला महाराष्ट्र आहे का? हाच शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? हेच संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला दिले का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकाही केली. ”मी आधीही सांगितलं होतं, ही हत्या ज्याने केली, त्या म्होरक्याला धनंजय मुंडे आश्रय देत आहेत. त्यांना मंत्रीपद देऊ नका तरीही त्यांना मंत्रीपद देण्यात आलं. मी आज सांगतो आहे, की जर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद दिलं.तर मी बीडचं पालकत्व घेईन. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथे जर कुणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही”, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला.