मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्व वृत्तपत्र समूहांना शासकीय जाहिरात मिळावी – अजित तेरकर

0 75

 

 

वृत्तसेवा – गजानन जोशी – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात साजरा करण्यात येतो. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी ५६२ संस्थाने ही भारतात विलीन झाली मात्र निजामाचे राज्य असलेल्या हैद्राबाद संस्थान (मराठवाडा तेलंगणा व कर्नाटकचा काही भाग) भारतात विलीन झाले नव्हते.

 

निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ,दिंगबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, दगडाबाई शेळके, जनार्दन मामा, विठ्ठलराव काटकर सुर्यधान पवार, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे यांच्यासह अनेकांनी यासाठी लढा दिला.

 

भारताचे तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामांच्या तावडीतून सुटका झाली व त्यादिवशीपासून मराठवाडा स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात येतो. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडयात तिरंगा ध्वज फडकवला जातो. विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. हा दिवस मराठवाडयाचा स्वातंत्र्य दिन आहे.

 

मा.मंत्री महोदयांना निवेदनाद्वारे विनंती केली असून,मराठवाड्यातील दैनिक,साप्ताहिक,मासिक हे शासनमान्य जाहिरात यादीत समाविष्ट असो किंवा नसो,जे वृत्तपत्र जिल्हा माहिती कार्यालयात नियमित हजेरी पटावर असतात अश्या सर्व दैनिक,सायं दैनिक,साप्ताहिक,मासिक यांची हजेरी तपासून त्याची एक सूची बनवून त्यांना १७ सप्टेंबर रोजीची जाहिरात दिली तर निश्चितच त्या वृत्तपत्र समूहाला थोडी-थोडकी का होईना शासनाची मदत मिळेल. व वृत्तपत्र समूहातील सर्व संपादक/पत्रकार मंडळी आपल्या निर्णयाचा नक्की गौरव करतील,कारण वृत्तपत्राचा आत्मा हा जाहिरात असतो,त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माहिती जनसंपर्क मंत्री आपण सर्वांनी मिळून यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी अखिल महाराष्ट्र पत्रकार व बहुभाषिक वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष अजित तेरकर,प्रदेश मुख्य सचिव गजानन जोशी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे…

error: Content is protected !!