भुमिगत गटार योजना, समांतर पाणी पुरवठा, नाट्यगृहासाठी निधी त्वरीत मंजूर करा-आमदार डॉ. राहूल पाटील यांची विधानसभेत मागणी
परभणी,दि 19 (प्रतिनिधी)ः परभणी शहर झपाट्याने वाढत असून शहरालगत असलेल्या वांगी, कारेगाव ही गावे नियोजीत हद्द वाढीमुळे परभणी महापालिका क्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेवर ताण पडणार असून समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे़ तसेच परभणी शहर महापालिका होवून आता १० वर्ष लोटली तरी नागरीकांच्या अत्यंत जिव्हाळ्याची भुमिगत गटार योजना अद्याप अंमलात आलेली नाही़ शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन योग्यरितीने होण्यासाठी भुमिगत गटार योजना लवकरात लवकर मंजूर करून यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा. मागील शासनाच्या काळात परभणी शहराचे सांस्कृतिक वैभव टिकवण्याच्या दृष्टीकोनातून नवीन नाट्यगृह निर्मिती करण्यात आली असून उर्वरीत १० कोटी रूपयांच्या निधीअभावी सदरील इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे़ त्यासाठी नगरविकास मंत्रालयाने त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉ.राहूल पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळा दरम्यान दि़१७ मार्च रोजी केली़ आ़डॉ़पाटील यांच्या मागणीस नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी सकारात्मक उत्तर देत वरील सर्व योजनांसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे सभागृहात आश्वासन दिले.