कलाशिक्षक जगदीश जोगदंड यांच्या रूपाने कवितेची ओळख प्रत्ययास-कवी इंद्रजित भालेराव
पूर्णा,दि 02 ः
शिकून मोठे झाल्यावर गावची माती आणि माणसं यांच्यासाठी समर्पण देणारे पत्रकार तथा कलाशिक्षक जगदीश जोगदंड यांच्या रूपाने ‘गावाकडं चल माझ्या दोस्ता’ ही माझी कवितेची ओळख प्रत्ययास आली, असे प्रतिपादन कवी इंद्रजित भालेराव यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिक कै. दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठान, पूर्णाच्यावतीने आयोजित पत्रकार तथा कलाशिक्षक जगदीश जोगदंड यांच्या सेवागौरव सोहळ्यात ता.(३१) बुधवार रोजी प्रमुख वक्ते म्हणून कवी इंद्रजित भालेराव बोलत होते. आदर्श कॉलनी येथे सोहळ्यात यावेळी मंचावर वेदमूर्ती उमेशमहाराज टाकळीकर, खासदार संजय जाधव, शिक्षक आमदार विक्रम काळे, प्राचार्य मोहन मोरे, सौ . रजनी मोरे, राजेश्वरराव चव्हाण, एकनाथराव शिंदे, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, हनुमंत राजेभोसले, श्री. जगदीश व सुक्षम जोगदंड, वरिष्ठ पत्रकार गणेश पांडे,प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कदम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम हे होते.
आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलताना श्री. भालेराव म्हणाले, गुणी लोकांनी समाजासाठी झटणाऱ्या, चांगले वाचन आणि लेखन करणाऱ्या, उत्तम गोष्टी आणि उत्तम व्यक्तिमत्त्व असणा-या कलागुणी शिक्षकाचा केलेला सेवागौरव समस्त पूर्णाकरांसाठी महत्त्वाचा आहे.
सत्काराला उत्तर देताना श्री. जोगदंड यांनी सांगितले की, अंतर्मनाने चांगल्या गोष्टींना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांना पाठबळ दिले. निष्ठेने आणि विवेकाने इथल्या मातीत स्वतःला झोकून देऊन सिद्ध केले.
यावेळी आमदार विक्रम काळे म्हणाले, समाजाने गुरुजींचा केलेला सेवागौरव बहुमानाचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या शिक्षकांच्या वाट्याला असे क्षण येतात. तर खासदार संजय जाधव यांनी, वैचारिक बांधिलकी आणि चांगले अनुभव स्वीकारून स्वतःचे अस्तित्व टिकवणारे जोगदंड यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम आहे, अशा भावना व्यक्त केल्या. विविध कार्यात त्यांची तळमळीने काम करण्याची वृत्ती कौतुकास्पद आहे .
सत्काराला उत्तर देताना श्री. जोगदंड यांनी सांगितले की, अंतर्मनाने चांगल्या गोष्टींना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांना पाठबळ दिले. निष्ठेने आणि विवेकाने इथल्या मातीत स्वतःला झोकून देऊन सिद्ध केले.
पूर्णा शहरवासीयांच्या वतीने शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन श्री. जोगदंड यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. मानपत्राचे शब्दांकन डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी केले. तर मानपत्राचे वाचन डॉ. हरिभाऊ पाटील यांनी केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह संतोष एकलारे, सहकार्यवाह अमृतराज कदम,विक्रम विजयकुमार कदम ,रवी कदम,दत्ता कदम,विनायक कदम,गंगाधर खाकरे व मित्रमंडळाने पुढाकार घेतला. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, गौर गावचे गावकरी, शेती सेवा ग्रुप, देणं समाजाचं ग्रुप व इतर अनेकांनी पुस्तके, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन जगदीश जोगदंड यांचा सन्मान केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल कदम यांनी केले सूत्रसंचालन डॉ .दिलीप शृगारपुतळे यांनी केले आभारप्रदर्शन राजेश धुत यांनी केले .