अशोकराव चव्हाण पुन्हा चर्चेत…भाजप खासदारांच्या दाव्यामुळे काँग्रेसच्या गटात चिंता वाढली

0 278

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विविध प्रकारचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात आले तर त्यांचं स्वागत करू, असं विधान चिखलीकर यांनी केलं. यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका वक्तव्याचा हवाला दिला आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी देखील अशोक चव्हाण भाजप मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र चव्हाण यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम देत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुखेड आणि नांदेड मध्ये सुपर वॉरियर्सशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेकजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे आपल्या भाषणात म्हणाले.
येत्या काही दिवसांत हा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडणार आहे. भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालण्यास कोणी इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत आहे, असं सूचक वक्तव्य देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक दावा केला. महाविकास आघाडीची सत्ता असताना अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही. मात्र आताच्या सरकारने चव्हाण यांच्या कारखान्याला भरपूर मदत केली आहे. तसेच त्यांच्या मागण्या देखील पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजप मध्ये प्रवेश करतील असा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया काही मिळू शकली नाही. भाजप खासदाराच्या या दाव्यामुळे काँग्रेस गटात चिंता वाढली आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केलेले भाकीत खरे ठरणार?

काही दिवसांपूर्वी छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसमधील आमदारांचा एक गट लवकरच भाजपमध्ये जाईल, असे वक्तव्य केले होते. येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधील मोठा आमदारांचा गट भाजपकडे गेल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको, अशी कबुलीच काँग्रेसच्या या नेत्याने दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

error: Content is protected !!