अवलिया अरुण
अवलिया..…
किती सुंदर शब्द...
हा शब्द ऐकला किंवा वाचला की; मला लग्नाअगोदर प्रश्न पडायचा की; माणसे खरंच अवलिया असू शकतात का? आणि म्हणूनच काय की, एखादा माणूस अवलिया या शब्दाला साजेसं जीवन कसे जगू शकतो हे जवळून अनुभवता यावे यासाठीच माझी लग्नगाठ अशाच अवलियाशी पडली असावी. मी ज्यांचा ‘अवलिया अरुण’ असा उल्लेख केलेला आहे, ते माझे जीवनसाथी आहेत. त्यांच्या जीवनात मी जीवनसाथी म्हणून आल्याच्यानंतर मला खऱ्या अर्थाने कळायला लागले की, साधी राहणी आणि इतरांसाठी नेहमी काहीतरी चांगले करण्याची वृत्ती म्हणजे अवलिया माणूस.
जीव. जीवन.. आणि जगणे…
काही जीव हे अवलियासारखे जीवन जगण्यासाठीच जन्म घेतात आणि माझे जीवनसाथी सुद्धा असेच जगतात, असे मला वाटते. मला चांगले आठवते, लग्न झाल्या -झाल्या अरुण आणि मी आमच्या वांजोळा गावाकडे भावकीला भेटायला गेलो होतो. त्यावेळेस या माणसाने गावात आमच्या घराच्या शेजारी असलेल्या दुधना नदीच्या काठावर नेऊन मला फिरवून आणले होते. गावातील आईचे देऊळ, जमिनीतील पेव आणि आमच्या पूर्वजांची जुनी टोपाची माडी व आमच्या शेतातील प्रचंड आमराई स्वतः नेऊन दाखवली होती, त्यावेळी वाटले होते की, हा माणूस खूपच आपल्या वाट्याला येईल. पण नंतर प्रत्यक्ष संसारात दिवसभर शाळा-शेती आणि इतर सगळे कामे करून रात्रीला हा माणूस थोडाफार मी अनुभवला. सालो न् सालापासून माझा हाच अनुभव आहे. थोड्याच वेळात हा माणूस सगळं काही बोलणार, पण रमणार कमीच. त्यामुळे त्यांना मी ‘अवलिया’ म्हणते. सगळ्यांना माहीत आहे की, इतरांसाठी कधीही यांना आवाज द्या; हा माणूस नाही म्हणणार नाही. जीवतोड प्रयत्न करणारे आणि खस्ता खाणारे हे आहेत, हे अनेकजण सांगतील.
यांच्या बापाला हे चांगलंच माहीत होतं. म्हणून माझ्यासारखी पत्नी यांना त्यांनी करून दिली. लग्नानंतर यांना पैसे खर्चायचे मापच नव्हते. म्हणून यांचे बाप-माझे सासरे यांच्या माघारी माझ्याजवळ यांना न सांगता पैसे ठेवायचे. यांचे बाप-आण्णा फार लवकर जगाचा रामराम घेऊन गेले. ते गेल्यावर यांच्याबद्दल मला सतत व्यवहाराच्या दृष्टिकोनातून धाकधूकच होती. कारण कोणालाही सढळ हाताने मदत करणे, अर्थातच आर्थिक सहकार्य करणे, हा यांचा व्यावहारिक अडाणीपणा मला अवघड वाटायचा. पण यांनी ज्यांना ज्यांना मदत केली, त्यांनी त्यांनी यांच्या इमानदारी खातर घेतलेले पैसे उशिरा का होईना वापस दिले. त्यामुळे हा माणूस व्यवहारात टिकला. यांच्या गुरुमाय गयाबाई भालेराव माझ्या खूपच काळजीवाहू आहेत. हे स्वतः पैसे घालून अनेक उपक्रम करायचे आणि यांना अनेकजण पैसे गोळा करण्यासाठी पुढे करायचे; त्यावेळी गयाबाई यांना ‘पांगुळ’ म्हणायच्या. त्यांनी मलाही सांगून ठेवले होते की, “याच्या हातात पैसा कमीच ठेवत जा”, पण मी कधीही तसा प्रयत्न केला नाही. तरीही गयाबाईंचे म्हणणे यांना सतत आठवण करून द्यायची. त्यामुळे आत्तापर्यंत सर्वकाही व्यवस्थित निभावले आहे.
या माणसाला कोणतीही माणसं परकी वाटतच नाहीत. माणसे जोडण्याचा आणि जोडलेली माणसे सांभाळण्याचा भलताच नाद. त्यामुळे कित्येकजण यांचा वापर करून घेतात, हे यांना मी सांगायच्या अगोदर चांगले समजते, पण आपल्यामुळे कुणाचे भले होणार असेल तर, हा माणूस कधीही ओंजळभर नव्हे तर टोपलंभर त्याला देऊन टाकतो. हा यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे मी आता समजून गेले आहे आणि काही गोष्टी यांच्या माघारी कटवून टाकते. माझ्या या गोष्टींचा यांना रागही येत असेल, पण ठाऊक नसल्याचे भासवून माझ्या माघारी जमेल तशी मदत ते आताही करतातच आणि करतच राहणार. शाळा आणि शेती या दोन्हीही गोष्टी ग्रामीण भागाशी निगडित आहेत. शाळेत कोणतेही काम असू द्या, हा माणूस चार पैसे खर्चायला मागेपुढे पाहणार नाही. शाळेतल्या लेकरांसाठी आणि शैक्षणिक कामांसाठी अनेकदा यांनी मदतीचा हात दिलेला आहे. ‘दानापेक्षा गरजवंतांना दिले तर चांगलेच होते’, अशी यांची धारणा आहे. शेती हा बेभरोशाचा व्यवसाय आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील शेतकरी मेहनत करूनही पैशाच्या बाबतीत सदा न् कदा अडीनडीतच असतात. अशावेळी यांच्याकडे अनेक शेतकरी, शेतमजूर पैशासाठी येतात. मला चांगले आठवते, काही गावातल्या चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांनी यांच्याकडून पैसे नेले आणि बँकेचे व्याज न भरता यांचे पैसे वापरले. त्यांचे व्याज वाचले आणि यांचा पैसा वापरायला मिळाला. सुंदर शेळके नावाचा आमच्या मळ्यात सालगडी होता. त्याचे लेकरं मरता मरता वाचवले या माणसाने. नंतर तो आमच्या मळ्यातून शेजारी सालगडी म्हणून राहिला. त्याच्या मुलीचे लग्न होते तेव्हा त्याने त्याच्या प्लॉटच्या रजिस्ट्रीचे कागद यांच्या हातात आणून दिले आणि ‘एक लाख रुपयांची मदत करा’, असे म्हणाला. या माणसाने त्याचे कागद परत केले आणि त्याला नगदी एक लाख रुपये दिले. परत त्या एक लाख रुपयांतील वीस हजार रुपये त्याला सोडून दिले. असा हा आमचा साधा-सरळ माणूस. असे कितीतरी प्रसंग मला घडून गेल्यानंतर समजलेले आहेत. पण काही लोकांनी उसने घेतलेले पैसे परतही दिलेले आहेत.
या माणसाचा देवापेक्षा नियतीवर जबरदस्त विश्वास आहे. त्यामुळे माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत आणि वाईट माणसेही चांगली होतील, असा अव्यावहारिक दृष्टिकोन ठेवून हा माणूस माणसं सांभाळत राहतो. कित्येक मोठमोठाली माणसं या माणसाला जवळून जाणतात. मेहनती आणि अभ्यासू शेतकऱ्यांना स्वतः कारने महाराष्ट्रात चांगल्या शेतीतील पीक प्रयोग पाहण्यासाठी लाखो किलोमीटरचा प्रवास यांनी वीस वर्षांपूर्वीच केलेला आहे. एकदा असेच दौऱ्यावर असताना तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. आबा यांना त्यांच्या अंजनी या गावात भेटले होते. हे त्यावेळी शेळीपालन बघण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या भागात गेलेले होते. भेटी दरम्यान यांना आणि सोबत असलेल्या शेतकऱ्यांना आबा मनातून बोलले होते, ते शेतकरी ती आठवण काढून आजही माणुसकीने यांना भेटायला येतात. शरद पवारांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना यांचे शेतीतील सीताफळ आणि हनुमानफळाचे यशस्वी उत्पादन, विक्री आणि फळांची निर्यात केल्याची खात्री करून यांना पत्र पाठवून अभिनंदन केलेले आहे. आजही अनेक राजकारणी-अधिकारी यांच्या खूप जवळचे आहेत. पण त्यांच्याशी कामाशी काम करून हा माणूस शेतकरी-शिक्षक आणि साहित्यिकांमध्ये रमतो. कित्येक राजकारण्यांनी यांना “आमच्याबरोबर चला” म्हणून गळ घातलेले आहेत. पण हा माणूस त्यांच्याशी चांगली मैत्री ठेवून सुरक्षित अंतर ठेवतो. आता तर पत्रकारितेशी खूपच जवळून असल्यामुळे या माणसाचा अनेकांना दरारा वाटतो. त्यामुळे मी थोडी बेफिकीर आहे.
खादीचे कपडे, चांगली पुस्तके या माणसाला प्रचंड आवडतात. पुस्तकांच्या नादामुळे हा माणूस अगोदरच शाबूत राहिला असावा. यांचे वाचनही अफाट आहे. बाह्य जगात जगताना सदैव जागरूकता ठेवत हा माणूस विचारांचा मार्ग धरतो. काही माणसांचा धाकही या माणसाच्या मनाला आहे. यांचा खरा विश्वास यांच्या बापाने केलेल्या संस्कारांवर आहे, त्यामुळे यांच्या लेखी स्वार्थी माणसं शून्य आहेत. पण चांगल्या माणसांचे चांगले गुण हेरून त्यांना अनेक गोष्टींनी मढविताना यांची मात्र खूपच ओढाताण होते. स्वतः राबण्याचा गुण असल्यामुळे यांना स्वच्छतेची मनातून आवड आहे. शाळेत शौचालय साफ करताना किंवा परिसर साफ करताना हा माणूस कचरत नाही. ही गोष्ट यांच्यासोबतचे अनेक शिक्षक तुम्हांला सांगतील. शेतातही सालदाराबरोबर राबताना मालक कोण आणि सालदार कोण, हे नवख्याला ओळखूही येणार नाही; इतका हा माणूस त्यांच्याबरोबर राबतो. मळ्यात मरमर केल्यानंतर झाडाच्या बुडाला पाठ टेकवून मळ्यातील बैलं-शेळी-बकरू आणि कुत्र्याला चोंभाळत निवांत बसणारा हा एकांतप्रिय माणूस आहे. मला आणि माझ्या लेकरांना प्राणीमात्रांना आलेला अनुभव त्यांच्या तुलनेत कमी आलेला आहे, हे मी खुलेपणाने सांगत आहे.
या माणसाला चांगलेचुंगले पदार्थ घरून डब्यात खायला दिल्यानंतर हा सर्वांना घेऊन घास घास देईल. घरीही काहीही खाताना सगळ्यांना सोबत घेऊन खाईल. नाही म्हणायला आताही सकाळी सोबत चहा पिताना आपल्या वाट्याचे दोन-चार बिस्किटे स्वतः हातात घेऊन मला खायला देतात. खाण्यापिण्यात हा संगतीचा माणूस. तसा हा माणूस वागण्यात-बोलण्यातही दिलदार. पण सगळं सांगूनही कधी-कधी काही गोष्टी बोलणारच नाही. अगोदरच जरा गंभीर चेहरा असलेला हा माणूस आपण काही वेगळा ‘विषय’ काढला की, एकदमच गंभीर होणार. पण कालांतराने वातावरण निवळल्यावर पटवून देणार. त्यामुळे माझे नि यांचे कायम मिळतेजुळते. या माणसाला साध्या-साध्या गोष्टींत जास्त रस घेऊ वाटत नाही. कुठे जास्त गाडीवर बसून नेणार नाहीत. पण भारतभर फिरायला वातानुकूलित गाडीने घेऊन जाणार. धार्मिक कार्यक्रमाला येणार नाहीत किंवा मला कुठे सोडायचे असेल तर सोबत क्वचितच येणार. याची खात्री गयाबाईंना आहे. यांचे गुरुजी इंद्रजित भालेराव मला कधी विचारतात, “तुला अरुणने आणून सोडले का?”- या प्रश्नावर गयाबाईच सांगतात की, “त्याला कधी हे जमणार”. म्हणून मी लेकरांच्या सोबत जाते-येते.
आता तर यांना एकाच वेळी अनेक पातळ्यांवर कामे करावी लागतात. वर्तमानपत्रातील लेखनामुळे पळापळी होते. त्यामुळे मीही यांना कुठे चालण्याचा आग्रह करत नाही.
पण भारतभर फिरायला गेल्यानंतर बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी जाणून घ्यायला सांगणार. माहिती सांगणार. माणसाला परिपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून सगळं काही करणार. दै. सकाळच्या वतीने मी शेतकरी-शेतमजूर तनिष्का गटाची प्रमुख होते. सन २०१४ मध्ये आमच्या गटाने काही समाजोपयोगी कामे केली. त्यामध्ये वृक्ष लागवड, पालावरच्या महिलांची आरोग्य तपासणी व त्यांना पोषण आहार वाटप, बंदोबस्तावरील पोलिसांना फलाहार भेट, गोशाळेतील गाईंना चारा भेट इत्यादी. ही कामे करताना त्यांनी मला पाठिंबा दिला. इतरांप्रमाणेच बापाच्या माघारी यांनी गणागोताचीही आरोग्य सेवा केली. लग्नातील कामे आणि मानसन्मान करून उत्तम नातेसंबंध जपलेले आहेत.
यांना आठवत नसेल, पण यांचे मित्र आणि नाटककार राजकुमार तांगडे यांना “आधुनिक युगातील तुकाराम” म्हणतात. कारण २०१२ साली यांनी परभणीत त्यांचे “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” हे अप्रतिम नाटक परभणीकर रसिकांसाठी पदरमोड करून दाखवले होते. त्यावेळी या नाटकाच्या परवानगीच्या संदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर बराच गदारोळ झाला होता. पण यांचे मित्र आसाराम लोमटे यांनी हा विषय वर्तमानपत्रातून लावून धरला आणि नाटक प्रसारणाला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली. प्रचंड प्रतिसादाने ते नाटक परभणीकरांनी अनुभवले होते. यांनी त्यावेळी आणि नंतर वेळोवेळी राजकुमारांबरोबर निभावलेल्या मैत्रीमुळे राजकुमारांनी यांचा वर सांगितलेला उल्लेख केला होता.
आताही कुणाचे सुखापेक्षा दुःख असू द्या, हा माणूस पळत जाणार. एकीकडे यांचे सगळे चांगले आहे. तर दुसरीकडे अति गडबडीत स्वतःची कामे मागे पडतात. खिसा रिकामा होतो. स्वतः शारीरिक, मानसिक आणि आर्थिक जोखीम पत्करावी लागते. निभावून जाते पण यांची तगमग मला पाहवत नाही. बरं या माणसाचे समाधान दोन कष्टाच्या भाकरीतच आहे. यांना कधीच काही कोणाकडून अपेक्षा नाही. उत्तम कांबळे म्हणालेले आहेत, “खरं पाहता याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला पाहिजे होता, पण हा सरकारी निकषांच्या पुढचा शिक्षक आहे. याचे कामच आदर्श आहे”. एवढा थोर पुरस्कार कांबळेदादांनी दिल्यानंतर हा माणूस कशाला स्वतःहून आटापिटा करेल. संत कबीर या माणसाचे आवडते कवी आहेत. “कफन को जेब नहीं होती, क्योंकि मौत कभी रिश्वत नहीं लेती”, कबीरांच्या या ओळी सतत ध्यानात ठेवून जगणारा हा माणूस आहे. हे खऱ्या अर्थाने अवलियापण आहे, असे माझे मत आहे.
२७ जुलै २०२४ रोजी वयाच्या पन्नाशीत पदार्पण करणाऱ्या यांना मनातून शुभेच्छा!
-शीला अरुण चव्हाळ, परभणी.
७२१९८६७६०५