डॉ.दीपाली कांबळे यांना शासनाचा गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार प्रदान
परभणी :- दि. २७ मे
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ मानवत येथे कार्यरत असणाऱ्या पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपाली कांबळे यांना त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे पशुधन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासकीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. २० मे २०२२ रोजी शरदचंद्र पवार सभागृह, जिल्हा परिषद पुणे येथे पशुसंवर्धन मंत्री ना. सुनील केदार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. परकाळे यांच्या उपस्थितीत डॉ. दीपाली कांबळे यांना शासकीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार प्रदान करण्यात आला. औरंगाबाद विभागातून पुरस्कार घेणाऱ्या डॉ. दीपाली कांबळे ह्या पहिल्या महिला पशुधन विकास अधिकारी आहेत. महाराष्ट्र शासनाचा गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार सन २०१९ – २० करीता देण्यात आला आहे.
डॉ. दीपाली कांबळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत त्यांची पशुधन विकास अधिकारी म्हणून निवड झाली. हलाकीच्या परिस्थितीवर रडत न बसता संघर्ष करत त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असल्यामुळे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून शासनाने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.