आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम, ग्रामपंचायतीचे दप्तर अद्यावत करण्यासाठी जि. प.ची विशेष मोहीम
परभणी,दि 01 (प्रतिनिधी)ः
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामस्तरावर ग्रामपंचायती मधील 1 ते 33 प्रकारचे लेखे अद्यावत करण्यासाठी व ग्रामपंचायत प्रशासन सुधारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या मार्फत दि 1 जानेवारी ते 31 मार्च 2022 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा, मासिक सभा, महिला सभा बाबतचे लेखे व इतर महत्त्वाच्या नोंदी ग्रामपंचायतीकडून योग्यरीत्या ठेवल्या जात नाही यामुळे प्रशासकीय कामकाजात मोठा अडथळा निर्माण होताना निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीचे दप्तर अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतींना आता आपले दप्तर अद्ययावत करणे अनिवार्य असणार आहे. या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने दि 31 डिसेंबर 2021 रोजी परिपत्रक देखील काढण्यात आले आहे.
हा आहे मोहिमेचा प्रमुख उद्देश
1. ग्रामपंचायत मधील 1 ते 33 लेखे अद्यावत आणि सुस्थितीत ठेवणे
2. शासन निर्णयानुसार अभिलेख ई आज्ञावली मध्ये ऑनलाईन करणे
3. ग्रा. पं. मध्ये आवश्यक नोंदवह्या ठेवणे व माहिती अद्यावत करणे
4. ग्रा.पं. मधील देण्यात येणाऱ्या सोई सुविधांचा दर्जा सुधारणे
5. ग्रा.पं. स्तरावरील अभिलेखे वर्गीकरण करणे.
6. स्थायी आदेश संचिका, अधिसूचना शासन निर्णय संचिका अद्यावत ठेवणे
7. महत्वाचे अभिलेखे स्कॅनिंग करणे
8. जुनी निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करणे
सदर अभियानाचे सनियंत्रण जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे करतील तर तालुका स्तरावर गट विकास अधिकारी करणार आहेत.दि 1 ते 6 जानेवारी 2022 या कालावधीत उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना सदर अभिलेखे अद्यावत करण्या बाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीमधील अभिलेखे आद्यवत करण्याच्या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे विहित वेळेत मिळतील आणि त्यांचा वेळ वाचण्यास मदत होईल.
शिवानंद टाकसाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद परभणीस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायतीमधील अभिलेखे अद्ययावत करण्याची कालबध्द अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग नोंदवून आपली ग्रामपंचायत अद्ययावत व सुसज्ज करावी.
ओमप्रकाश यादव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रापं जिल्हा परिषद, परभणी.