मोठी बातमी..या महापालिकेत मास्क सक्ती; आयुक्तांचे आदेश

0 30

: देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.

विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल, असेही चहल यांनी निर्देश दिले.

कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली.

याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत.

वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

जनजागृतीवर भर द्या, कोविड जागरुकता महत्त्वाची

कोविड रुग्णांची संख्या कमी करणे यासाठी कोविड जागरुकता महत्त्वाची असल्याने जनजागृतीवर भर द्यावा.

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील ६० वर्षेंपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा सातत्याने उपयोग करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित ठरेल. त्यांना मास्कची सक्ती नसली तरी खबरदारी घेणे हे अधिक योग्य आहे. शक्यतो, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱयांना देखील सक्ती नसली तर जनतेशी येणारा संपर्क पाहता, त्यांनी मास्कचा यापुढे उपयोग करावा. महानगरपालिका कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना देखील मास्क लावण्याची नम्रपणे विनंती करावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रुग्ण तसेच अभ्यागतांना देखील मास्क लावणे हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सक्तीचे करण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.

मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालये यांनी कोविड पूर्वसज्जतेचा भाग म्हणून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करावी, ही रंगीत तालीम करताना केंद्र सरकारच्या सुचनेनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात यावी.

मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड बाधितांवर उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा सुसज्ज करावी, वाढत्या रुग्णसंख्येची गरज लक्षात घेवून कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

error: Content is protected !!