TET परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकारणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर आहे. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. आज पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारी तुकाराम सुपेच्या घरात घबाड सापडले असल्याची माहिती आहे. सुपेच्या घरात दीड किलो सोने आणि मोठी रोकड सापडली असल्याची माहिती आहे.
तुकाराम सुपेच्या घरात जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सुपेच्या घरातून जवळपास दीड किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांच्याकडून देण्यात आली आहे.
4 कोटी 20 लाख रुपयांचा घोटाळा
हा संपूर्ण घोटाळ्यात 4 कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे लोक 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पैसे घेत होते. यातील तुकाराम सुपेकडून तब्बल 88 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. यासोबतच, तुकाराम सुपेकडूनच 5 तोळे दागिने आणि 5.5 लाखांची एफडी असलेली कागदपत्रे सुद्धा सापडली होती.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे इयत्ता 5 वी आणि 8 वी शिक्षवृत्ती परीक्षा, शिक्षक पात्रतपा परीक्षा, टायपिंग व शॉर्ट हँड परीक्षा, ईसीबी शिष्यवृत्ती परीक्षा, खात्याअंतर्गत सेवा परीक्षा, डि. एल. ई. डी इ. परीक्षांचे आयोजन खासगी कंत्राटी कंपन्यांमार्फत शिक्षण विभागाकडून केले जाते. त्यासाठी 2019 मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातीनुसार 19 जानेवारी 2020 रोजी ही पात्रता परिक्षा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीस कंत्राट दिले होते.
या कंपनीचा महाराष्ट्रातील संचाकल प्रितीश देशमुख याच्यावर ही सर्व जबाबदारी होती. याचाच फायदा घेत त्याने तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांना विश्वास घेतले आणि वेगवेगळ्या एजंटांना मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना पात्र करुन देण्याच्या बदल्या पैसे वसूल केले. नंतर परीक्षा निकालाच्या प्रक्रिये दरम्यान फेरफार करुन त्यांना पात्र करण्यात आले.