भाजपची पडद्यामागची बॅटिंग संपली, आता थेट मैदानात

0 87

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर काल भाजपच्या गोटातून फारशा काही प्रतिक्रिया येताना दिसत नव्हत्या. भाजप वेट अॅण्ड वॉट भूमिकेत होती. अर्थात या सगळ्या घडामोडींशी भाजपचा प्रत्यक्ष संबंध होता. पण भाजप पडद्यामागून बॅटिंग करत होती. भाजपकडून काल दिवसभर पडद्यामागून बॅटिंग सुरु होती. पण आजचं चित्र वेगळं आहे. भाजपच्या काही नेत्यांना सुरतहून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामध्ये डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांचादेखील समावेश होता. भाजपच्या काही नेत्यांकडून शिवसेनेच्या बंडखोरांची काळजी घेतली जात असताना इकडे महाराष्ट्रात शिवसेनेकडून बंडखोरांना स्वगृही परतण्यासाठी प्रचंड विणवण्या केल्या जात आहे. तर भाजप आता पुढच्या घडामोडींसाठी थेट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. भाजपकडून तसे प्रयत्नच सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरतमध्ये दाखल झाले आहेत. तसेच ते तिथून गुवाहाटीच्या देशाला देखील रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे पुण्याहून सुरतला गेले. त्यानंतर सुरतहून ते चार्टड फ्लाईटने गुवाहाटीला रवाना झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे दामोलीचे आमदार योगेश कदम हे देखील होते, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर आमदार मंजुळा गावीत, माधुरी मिसाळ आणि गोपाळ दळवीही गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपने कालपर्यंत आपला या संबंध प्रकरणाशी काहीच संबंध नाही, असंच म्हटलं होतं. विशेष म्हणजे गुजरातमध्ये काल जे काही घडत होतं त्यावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सर्व प्रकरणासोबत आपला काहीच संबंध नसल्याचं म्हणत त्यांनी जबाबादारी झटकली होती. जे काही केलं आहे ते सगळं शिंदे यांच्याच गटातील नेत्यांनी केल्याचा दावा त्यांनी केला होता. पण गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि गृहमंत्री हर्ष संघवी हे सोमवारी रात्री सुरतच्या त्याच पंचतारांकीत हॉटेलमध्ये होते जिथे शिवसेनेचे बंडखोर आमदार आले होते. गुजरातच्या गृहमंत्री आणि सी. आर. पाटील यांनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांचं स्वागत केलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यांनीच हॉटेलची सर्व अरेंजमेंट केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजप या आमदारांना पड्यामागून पाठिंबा देत असल्याचं उघड झालं होतं. पण आता भाजप समोरुन मदत करत आहे, असं स्पष्ट होताना दिसत आहे.

दरम्यान, शिवसेनेतून फुटलेल्या गटाला घेऊन भाजप थेट सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही किंवा तसे करता येत नाही. यासाठी आधी विरोध पक्ष हे सरकार अल्पमतात असल्याचे पत्र राज्यपालांना देईल. त्यानंतर राज्यपाल विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देतील. त्यानंतर फ्लोवर टेस्टमध्ये विद्यमान सरकारचे भविष्य ठरेल. जर सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर विरोधकांना राज्यपालांकडे बहुत असल्याचा दावा करावा लागेल. त्यानंतर बहुमताचा दावा करणाऱ्या गटाला बहुमत सिद्ध करायला राज्यपाल आमंत्रित करतील. बहुमत सिद्ध केल्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल.

विशेष म्हणजे या सर्व आगामी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेटीगाठींना वेग आला आहे. शिवसेना समर्थक अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज सागर बंगल्यावर जावून भेट घेतली. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली. आगामी सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवरच या सगळ्या भेटीगाठी सुरु असल्याचं मानलं जात आहे.

error: Content is protected !!