अर्थसंकल्प: गॅस सिलिंडर महागणार की स्वस्त होणार?

0 46

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी २०२४ रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना नेमकं काय मिळणार? याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, अर्थसंकल्पापूर्वी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस महागणार की स्वस्त होणार? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तसं पाहता अर्थसंकल्प आणि गॅस सिलिंडरच्या दरात होणारा बदल यामध्ये तिळमात्र संबंध नाही. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. मात्र, गेल्या वर्षी २०२३ साली अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गॅस कंपन्यांनी LPG गॅसच्या किंमतीत तब्बल १०० रुपयांची वाढ केली होती.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर किती?

मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९०२.५० रुपये इतका आहे. तर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, चेन्नईत ९१८.५० रुपये इतका आहे. यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी घरगुती सिलिंडरचे दर बदलले होते.

वर्षभरात किती रुपयांनी महागला गॅस सिलिंडर?

वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १७ वेळा बदल झाला आहे. १ मार्च २०२३ रोजी दिल्लीत गॅस सिलिंडरचा दर ११०३ इतका होता. यानंतर, एकाच वेळी तो २०० रुपयांनी स्वस्त करण्यात आला.तेव्हापासून आतापर्यंत घरगुती गॅसच्या किमतीत कुठलाही बदल झालेला नाही. सद्या दिल्लीत घरगुती गॅसचा दर ९०३ रुपये इतका आहे.

व्यावसायिक गॅस किती रुपयांनी महागला?

मागील वर्षभरात कॉमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ४९ वेळा बदल झाला आहे. गेल्या महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या किमतीत किरकोळ बदल करण्यात आला होता. दिल्लीत कॉमर्शिअल गॅसची किंमत १७५५.५० रुपये, कोलकात्यात १८५९, मुंबईत १७०८.५० तर चेन्नईमध्ये १९२४.५० रुपयांवर पोहोचला आहे.

error: Content is protected !!