उमरा येथे विविध स्पर्धा आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
पाथरी / प्रतिनिधी – आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरा येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा. व्य. स. अध्यक्ष सुरेशराव कोल्हे हे होते तर प्रमूख पाहुणे म्हणून प्रकाशराव कोल्हे, बालासाहेब कोल्हे, मोहनराव कोल्हे, गणेशराव कोल्हे, भागवतराव शेळके, कोतवाल श्री. चव्हाण हे होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देवून श्री. दिपक कोल्हे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम शाळेने आयोजित केलेली भाषण स्पर्धा घेण्यात आली. भाषण स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली त्यामध्ये वर्ग 1 ते 4 व वर्ग 5 ते 7 यावेळी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी अंगावर शहारे येतील अशा पद्धतीने छ.शिवाजी महाराजांचे प्रसंग, व संपूर्ण जीवनपट उलगडून सांगितला. काही मुलांनी इंग्रजी भाषेतून सुद्धा महाराजांचा गुणगौरव ऐकविला. सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून भाषण करणाऱ्या मुलांचे कौतूक केले.
भाषण स्पर्धेनंतर शिवाजी महाराजांवर आधारित विविध गाण्यावंर मुलींनी सुंदर नृत्यविष्कार सादर केले. टाळ्यांच्या गजरात सर्व मुलींना विद्यार्थी व मान्यवरांनी प्रतिसाद दिला व कौतुक केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात छ.शिवाजी महाराज व स्वराज्य या विषयावर आधारित निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरेशराव कोल्हे यांच्याकडून बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. वायभासे सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. गाढवे सर व श्री. दिपक कोल्हे सर यांनी परिश्रम घेतले.