नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंड
जबाबदार अधिकाऱ्याकडून खर्च वसूल करण्याची मागणी
सेलू / नारायन पाटील – शहरात विकासकामांचा धडाका मागील काही दिवसांपासून सुरू आहे.नवीन रस्ते,नाली,सुशोभीकरण आदी नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ते मदरसा पर्यंत असलेला रस्ता हा नगर परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करून नवीन राज्य महामार्ग गेल्यावर्षी तयार करण्यात आला होता.
या राज्य महामार्गावर दळण वळण मोठ्या प्रमाणत वाढलेले असून नागरी वस्ती मुळे दरदिवशी अनेक अपघात होत आहेत.त्यातच भरीस भर म्हणून वालूर नाका परिसरात जलवाहिनी जोडणीचे काम मागील दीड महिन्यापासून हाती घेण्यात आले असून नवीन झालेल्या रोडवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नसून नवीनच झालेल्या राज्य महामार्गाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे.हा राज्य महामार्ग बनविण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अंतर्गत असलेल्या जलवाहिनीचे काम त्याच वेळी हाती घेवून पूर्ण केले गेले नाही त्यामुळे सद्यस्थितीत नवीन झालेला रोड खोदून जोडणी करण्यात येत आहे.या मनमानी कारभारामुळे नागरिकांकडून गोळा केलेला पैशाचा अपव्यय होत असून गैर जबाबदारीने वागणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी मोरया प्रतिष्ठान व सेलू शहरातील नागरिकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.