कोळशाची टंचाई; देशात बत्ती गुल होण्याची शक्यता
नवी दिल्ली – चीनमध्ये सध्या विजेचं संकट सुरू आहे. उद्योगांची वीज कापली जात आहे. त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. परंतु भारतातही वीज निर्मितीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. देशातल्या औष्णिक विद्युत प्रकल्पांना कोळशाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. बऱ्याचशा वीज प्रकल्पांमधील उत्पादन बंद झालं आहे. तर आणखी अनेक प्रकल्पांमधील वीज उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. चीनच्या एका कृत्यामुळे भारत अडचणीत आला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि अन्य एजेंसीच्या आकडेवारीनुसार तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. मंत्रालयातील आकडेवारी नुसार देशातील एकूण 135 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांपैकी फक्त 72 केंद्रांमध्ये 3 दिवस पूरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिला आहे.
भारत ऑस्ट्रेलियाहून कोळशाची आयात करतो. सध्या चीनच्या बंदरांवर भारताकडे येणारा २० लाख टनांहून अधिक कोळसा अनेक महिन्यांपासून पडून आहे. ऑस्ट्रेलियाहून कोळसा खरेदी केलेल्या व्यक्तींनी याबद्दलची माहिती दिली. चीनच्या बंदरांवर कोळसा पडून असल्यानं भारतामध्ये वीज संकट निर्माण होऊ शकतं.
ऑस्ट्रेलिया सध्याच्या घडीला भारताला १२ ते १५ डॉलर प्रतिटन दरानं कोळसा विकतो. हा जगातील सर्वात स्वस्त कोळसा असून त्याचा दर्जादेखील चांगला आहे. भारतात सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या देशात कोळशाचं उत्पादन कमी असल्यानं ऑस्ट्रेलियाहून कोळसा मागवतात. भारताला ऑस्ट्रेलियाकडून सवलतीच्या दरात कोळसा मिळतो. गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. त्याशिवाय भारत आणि चीनचे संबंधदेखील फारसे चांगले नाहीत. लडाखजवळच्या सीमावर्ती भागांत चीननं सैनिकांची जुळवाजुळव सुरू केली आहे. चीन स्वत: वीज संकटाचा सामना करत आहे. हिवाळा सुरू असल्यानं या संकटाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र यानंतरही चीननं ऑस्ट्रेलियाहून कोळसा मागवण्यात रस दाखवलेला नाही. भारतीय कंपन्यांनी ऑस्ट्रेलियाहून २० लाख टन औष्णिक कोळसा चीनच्या बंदरांमध्ये पडून आहे.
तज्ज्ञांच्या मते, 135 औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये एकूण 66.35 टक्के विज निर्मिती केली जाते. जर 72 विजनिर्मिती केंद्र कोळशाच्या अभावी बंद झाले तर साधारण 33 टक्के विजेची निर्मिती कमी होईल. यामुळे देशात विजेचं संकट उत्पन्न होऊ शकतं.
ऑगस्ट 2019 मध्ये भारतात दररोज 10660 कोटी युनिट वीज वापरली जात होती. ती ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये वाढून 14420 कोटी युनिट झाली आहे. दोन वर्षात कोळशाचा वापर 18 टक्क्यांनी वाढला आहे.