पूर्णेत जापनीज इन्सेफेलाइटिस लसिकरणाला सुरुवात

0 16

पूर्णा(प्रतिनिधी)
जापनीज इन्सेफेलाइटिस (Japanese Encephalitis) हा एक मेंदुज्वर आजाराचा प्रकार आहे. देशासह राज्यातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. हा आजार डासांपासून पसरणाऱ्या विषाणूचा प्रकार आहे. लहान मुलांकरिता तो जीवघेणा ठरू शकतो. यामध्ये ३० टक्‍के रुग्ण दगावले जाऊ शकतात, तर ४० टक्‍के रुग्णांना कायमचे अपंगत्व येऊ शकते.या आजारावर आजतागायत कोणताही निश्चित अथवा ठोस उपाय उपलब्ध नसल्याने हा आजार होऊ नये, याकरिता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या आजाराची लस मोफत उपलब्ध केली आहे
ही लस अत्यंत सुरक्षित असल्याकारणाने जागरूक पालकांनी आपल्या बालकांना या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही लस देणे आवश्यक आहे. त्‍यासाठी ग्रामीण रुग्णालयाने नियोजन  केलेल्या पूर्णा शहर व परिसरातील अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये तसेच शाळाबाह्य परिसरात ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी आपल्या बालकाचे न चुकता लसीकरण करून घ्यावे व या मेंदुज्वराच्या आजारापासून सुरक्षित राहावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.लक्ष्मण नाईक यांनी केले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार परभणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लखमवार यांच्या सुक्ष्म नियोजना खाली वैद्यकीय अधीक्षक डॉ लक्ष्मण नाईक यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने येथील अभिनव विद्या विहार शाळेत सोमवारी ता.३ मार्च रोजी जापनीज इन्सेफेलाइटिस (मेंदुज्वर प्रतिबंधक ) लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ नाईक बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना युवानेते नगरसेवक अँड राजेश भालेराव यांच्या हस्ते पार पडले.यावेळी १ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत जापनीज इन्सेफेलाइटिस लस टोचण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन शिंदे,फार्मसिस्ट अब्दुल वहीद फारुकी,आरोग्य निरीक्षक सुनिल वाघमारे,सहा निरीक्षक उबाळे,कुलदीप खंदारे,रवि वाघमारे,परिचारिका सिंड्रेला झांबरे, पुजा काळे, प्राजक्ता लाड, नंदिनी गुट्टे, भाग्यश्री परनाटे शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

error: Content is protected !!