विद्यार्थी विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचा – शाम मचाले
सेलु,दि 30 ः
विद्यार्थी विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचा असून सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो,असे प्रतिपादन मुख्याध्यापक शाम मचाले यांनी बुधवार (ता २९) रोजी जि.प.शाळा केमापूर येथील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात केले.पुढे बोलताना ते म्हणाले,की शाळेतील या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो व विद्यार्थी आपल्या मुक्त आविष्कारातून कले सोबतच ज्ञानग्रहण करतो.अशा कार्यक्रमातून नक्कीच भविष्यातील कलाकार घडतील,म्हणून पालकांनीही कार्यक्रमास प्रतिसाद दिला पाहिजे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिताराम सारोक हे होते.यावेळी मंचावर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व नारायण आष्टकर उपस्थित होते.
बाल कलाकारांनी
बालगीते,शेतकरी गीते,कोळी नृत्य व देशभक्ती गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली तर ‘ मामा,तुमची मुलगी द्या फक्त’ या विनोदी नाटिकेच्या माध्यमातून मुलींचा घटता जन्मदर व त्याचे होणारे दुष्परिणाम,स्त्री जन्माचे स्वागत,हुंडाबंदी अशा ज्वलंत विषयाला हात घालत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.शरद ठाकर यांनी केले तर सुत्रसंचलन प्रणिता गाडे व प्रभावती घुगे यांनी केले आभार प्रदर्शन दगडोबा माघाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती केमापूर यांनी पुढाकार घेतला.