इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला…
रायगड : राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा १3 वर पोहोचला असून या दुर्घटनेत आतापर्यंत ५७ जणांना वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती आहे. दरम्यान, बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. अशात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, दादा भुसे, मदत पुनर्वसनमंत्री अनिल पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणांकडून सुरू असलेले घटनास्थळावरील बचावकार्य थांबवण्यात आले आहे.
रात्रीच्या अंधारात डोंगराच्या दरडीखाली हे गाव दबले गेल्याने अनेकांना काही कळण्याआधीच दुर्दैवाने मृत्यूने गाठलं. यामध्ये मृतांच्या नावांची यादी समोर आली असून १३ जणांनी आपला जीव गमावला आहे तर ६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील परिस्थितीचा आणि चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आतापर्यंत 103 लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले असून 13 जणांचा मृत्यू झाला. काही नागरिक भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेऊन घेतला जात असल्याचे सांगितले. दरम्यान, या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी 50 कंटेंनरची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल असे स्पष्ट केले.
बचाव पथकातील अधिकाऱ्याचा मृत्यू
इर्शाळवाडीतील घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. हे जवान डोंगर चढत होते. तेव्हा बेलापूरहून आलेल्या एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा नंतर मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे या घटनेतील बळींचा आकडा 13 वर पोहोचला आहे.
विधानसभेत सांगीतला दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम
इर्शाळगडावरील याच दुर्घटनेबाबत आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन दिलं आहे. फडणवीसांनी आपल्या निवेदनात दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि मदत कार्यासंदर्भाती सविस्तर माहिती दिली.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “रायगडमधील इर्शाळवाडी येथे मध्यरात्री दुर्घटना घडली. इर्शाळवाडीला जाण्यासाठी रस्ता नाही, पायी चालत जावं लागतं. गेल्या तीन दिवसांत म्हणजेच, 17 जुलै ते 19 जुलै त्या भागांत 499 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रात्री साडेदहा वाजता ही दुर्घटना घटना घडली आहे. इर्शाळवाडीत 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान सदरची घटना घडली आहे. दुर्घटना घडल्यानंतर 11.30 च्या दरम्यान जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. 12 वाजता राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली आणि त्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.