नैराश्य / मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर Major Depressive Disorder
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त परभणी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. सुभाष काळे यांची मानसिक आजारांवर विशेष लेख मालिका
‘नैराश्य’ हा मनोविकार प्रामुख्याने मेंदूतील सिरोटोनीन व नॉर एपिनेफ्रिन या न्यूरोट्रान्समीटरच्या अभावामुळे होतो. इतर शारीरिक आजाराप्रमाणेच हा मेंदुतील रासायनिक बदलामुळे होणारा मानसिक आजार आहे.
आपल्यापैकी प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना कधी निराशेची भावना अनुभवलेली असते; पण ही भावना काही काळापुरतीच मार्यादित असते. अशी तात्पुरती निराशेची भावना होणे म्हणजे काही नैराश्य हा मानसिक आजार नाही.
नैराश्य या मानसिक आजारात रुग्णाला दिवभर सतत निराश, उदास वाटते. करमत नाही. कुठल्याही कामात रस वाटत नाही. त्याला काहीही करावेसे वाटत नाही. जसे आपण वेळ मिळतो तेव्हा दैनंदिन जीवनात कधी वर्तमानपत्र वाचतो; तर कधी टी.व्ही. पहातो किंवा कुणा सोबत गप्पा मारतो. पण नैराश्य ह्या आजारात रुग्णाच्या ह्या गोष्टीतला इंट्रेसच निघून गेलेला असतो. त्याची एकाग्रता भंगपावते. तो कोणत्याही कामात मन एकाग्र करू शकत नाही. त्यामुळे काही काही गोष्टी त्याच्या लक्षातही राहात नाहीत. त्यामुळे नैराश्य झालेले विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत.
नैराश्य या मनोविकाराने ग्रासलेल्या रुग्णाला झोप येत नाही. काही लोकांची रात्रीची सुरूवातीची झोप उडते. त्यांना लवकर झोप लागत नाही. तर काही रुग्णांना कशीबशी वेळेवर झोप लागले; परंतु मध्यरात्री जाग येते आणि मग पुन्हा झोप लागत नाही. रूग्ण झोपेसाठी बैचेन होतो. मग त्यावेळी त्याच्या मनात नाही नाही ते भलते विचार यायला लागतात.
नैराश्यग्रस्त लोक एक तर अतीसुस्त होऊन जातात किंवा अती बैचेन. अती सुस्त झाल्यावर ते बोलत नाहीत. खातपीत नाहीत. काही काम करत नाहीत. नुसते पडून राहतात.
याउलट जेव्हा अतिबैचेन होतात तेव्हा ते एका जागी स्थिर राहू शकत नाहीत. सतत उठतात. बसतात. हात एकमेकांवर घासत राहतात. थरथरतात. थोड्याही आवाजाने दचकताते. त्यांना थोडाही आवाज सहन होत नाही.
नैराश्यग्रस्त व्यक्तीला छोट्याशा गोष्टीवरून सारखे रडू येते. डोळ्यात येताजाता अश्रू येतात. अशी व्यक्ती क्षुल्लक कारणावरून एकदम रडायला लागते. त्यांच्या मनात अपराधीपणाची न्यूनतेची भावना निर्माण होते. मी वाईट आहे; पापी आहे जगण्यास नालायक आहे इत्यादी विचार मनात यायला लागतात.
मी कधीच बरा होऊ शकत नाही. हे सर्व आता असेच राहणार. असेही त्यांना वाटायला लागते. यातूनच मग आत्महत्त्येचे विचार यायला लागतात. जीवनच व्यर्थ आहे. जगण्याला काही अर्थ नाही. जीवन संपलेले बरे असे विचार येतात.
बऱ्याच नैराश्यग्रस्त रुग्णांमध्ये काही शारीरिक लक्षणेही दिसून येतात. डोके दुखणे; पोट दुखणे; पाठकंबर दुखणे, मान दुखणे यांसारखी लक्षणे अनेकदा नैराश्याची लक्षणे असतात. अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे दाखवूनही; अनेक प्रकारच्या शारीरिक तपासण्या करूनही जेव्हा निदान होत नाही व रुग्णास उपचाराचा फायदा होत नाही तेव्हा ही लक्षणे नैराश्यामुळे आली आहेत हे स्पष्ट होते. नैराश्य या आजाराच्या उपचारासाठी औषधोपचार; मानसोपचार व इलेक्ट्रो कन्हलजीव थेरपी म्हणजेच शॉक ट्रिटमेन्ट या तीन उपचारपद्धती वापरल्या जातात.
प्रथम आपण औषधोपचाराबद्दल जाणून घेऊ या. सुरूवातीला आपण पाहिले की, नैराश्य हा मानसिक आजार सिरोटोनीन व नॉर एपिनेफ्रीन या न्यूरोट्रान्समिटरच्या अभावामुळे होतो. म्हणून नैराश्यावरील औषधोपचारात जी औषधी वापरली जातात ती प्रामुख्याने सिरोटोनीन व नॉरएपीनेफ्रीन या न्यूरोट्रान्समिटर्सच मेंदूतील प्रमाण वाढवतात.
या औषधांचा पूर्ण परिणाम दिसून येण्यासाठी कमीतकमी ४ ते ६ आठवडे वाट पाहावी लागेल. संपूर्ण लक्षणे कमी झाल्यानंतरही कमीतकमी दोन वर्षे औषधोपचार चालू ठेवणे आवश्यक असते.
औषधोपचार सहा महिन्याच्या आतच बंद केला तर ५०% लोकांना पुन्हा नैराश्यचा विकार उद्भवतो; पण जर दोन वर्षे औषधोपचार चालू ठेवला तर ८० ते ८५% लोक विकार मुक्त राहतात व केवळ १० ते १५% लोकंनाच पुन्हा विकार होतो.
यावरून असे दिसते की, नैराश्य हा दीर्घकाळ चालणारा आजार आहे. पुन्हा पुन्हा हेणारा विकार आहे म्हणून काही लोकांना अनेक वर्ष नियमित औषधोपचार करणे जरूरी आहे. नैराश्य नसतानाही विकार पुन्हा होऊ नये यासाठी औषधोपचार चालू ठेवणे जरूरी आहे.
नैराश्यावर औषधोपचारसोबतच मानसोपचाराचीपण आवश्यकता असते. मानसोपचारात रुग्णाची अयोग्य विचारपद्धती बदलून योग्य विचार कसे करायचे हे रुग्णास शिकवले जाते. यामध्ये अल्बर्ट एलिस यांची रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी व अॅरॉन बेक यांची कॉग्नीटिव्ह बिहेविअर थेरपी या दोन सायकोथेरपी प्रामुख्याने उपयोगी ठरतात.
जे नैराश्यग्रस्त रुग्ण औषधोपचारांना प्रतिसाद देत नाहीत. ज्यांना प्रकर्षाने आत्महत्तेचे विचार येतात व जे अन्नग्रहण करत नाहीत अशा रुग्णांना इलेक्टोकन्हलजीव थेरपी म्हणजेच शॉक ट्रिटमेंटचा खूप फायदा होतो. ही थेरपी अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे कुठलाही कायमस्वरूपी अपाय दिसून आलेला नाही.
राधा एक ३५ वर्षांची महिला. शिक्षिका म्हणून नोकरी करते. सर्वांमध्ये मिळूनमिसळून राहणे; स्वतः मेहनत करणे व इतराना मदत करने असा तिचा स्वभाव. सर्व विद्यार्थ्यांना समजेल असे शिकवणे असा तिचा स्वभाव होता.
पण काही कारणामुळे तिचे अबॉर्शन झाले व नंतर तिचे हळू हळू ईतरांशी बोलणे कमी झाले. ती सुट्या पण खूप घेऊ लागली. घरी बेडवर पडून राही. जेवण पण कधी करत असे तर कधी नाही. रात्री झोप येत नसे. काही विचार करून एकटी रडत बसे. असे एक-दीड महिना चालले. तिच्या पतीचा व सासू सासऱ्यांचा असा समज होता की, अबॉर्शन मुळे ही चिंता करत आहे. नंतर तिला बर वाटवं म्हणून जास्त दिवसांची सुट्टी घेऊन तिच्या आईकडे पाठवले.
आईकडे पण राधाचे मन कशातच लागत नव्हते. आई सांगत असे की, राधा एवढा विचार करू नये ? तेव्हा ती म्हणत असे की मी काहीही विचार करत नाही. असे का होते मला कळत नाही. दिवस मोठा जातो. वेळ जात नाही. कशात मन लागत नाही. असे वाटते एकदाच मेलेले बरे.
नंतर तिचे डोके दुखत होते म्हणून एका डॉक्टरकडे तिची आई घेऊन गेली व म्हणाली की, “डॉक्टर, अॅबारशन पासून ही फार चिंता करते आणि आता डोके पण दुखत आहे.” तेव्हा डॉक्टरांनी तिला सर्व गोष्टी विचारून काही मेडीशिन दिले व मनोविकारतज्ञ (सायक्यॉट्रीस्ट ) यांना दाखवण्यासाठी सांगितले.
जेव्हा राधा मनोविकारतज्ञांना भेटली व औषधी सुरू केली तेव्हा प्रथम तिला व्यवस्थित झोप येत होती. नंतर आहार व्यवस्थित झाला व नंतर तिची लक्षणे एक एक कमी झाली व एक महिन्यानंतर पूर्वी प्रमाणे कामावर रूजू झाली.
सुनिल दहा वर्षांचा मुलगा. चौथी इयत्तेमध्ये शिक्षण घेतो. तसा तो मुळात हुशार. रोज शाळेतून आल्यानंतर होमवर्क करणे; अभ्यास करणे व खेळणे असा त्याचा नेहमीचा दिनक्रम असे. पण सध्या तीन-चार महिन्यांपासून त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आहे व खेळण्यासाठी पण जास्त जात नाही. थोडा चिडचिडपणा पण वाढला आहे व आईने अभ्यासाबद्दल थोडे काही म्हटले तर लगेच रडायला लगतो. ह्या गोष्टींवरून एक दोन वेळेस वडिलांनी मारले देखील.
दहा दिवसांपूर्वी त्याची शाळेत एक चाचणी परीक्षा झाली व त्याला नेहमी पेक्षा खूप कमी गुण मिळाले. जेव्हा पालक सभेसाठी आईवडील शाळेला गेले तेव्हा शिक्षकांनी पण चिंता व्यक्त केली की, सध्या सुनिलचा अभ्यास चांगला नाही. त्याचे क्लासमध्ये जास्त लक्ष नसते व नेहमी कसा थकलेला जाणवतो.
तेव्हा आईवडील शिक्षक ह्यांनी सुनिलला विचारले की, “तुला परीक्षेत कमी गुण मिळाले आहे तुला शिकवलेलं काही समजत नाही ? का तुझा अभ्यास होत नाही ?”
तेव्हा सुनिल म्हणाला, “माझी पाठ दुखते व कधी कधी पोट दुखते आणि माझे शिकवताना लक्ष लागत नाही व शाळेचा व शिक्षणाचा कंटाळा येतो.” तेव्हा शिक्षकांनीही त्याला डॉक्टरांना दाखवून त्याची तपासणी करण्याचा सल्ला दिला.
जेव्हा सुनिलला डॉक्टरांकडे दाखवले तेव्हा त्यांनी पोटाची सोनोग्राफी व पाठीच्या मणक्यांचा एक्स-रे काढण्यासाठी सांगितले. जेव्हा सोनोग्राफी व एक्स रे रिपोर्ट नॉर्मल आले तेव्हा डॉक्टरांनी सुनिलला विचारले, “तू काही चिंता करतोस का?”
तेव्हा सुनिलने सांगितले, “काही नाही. मी काही चिंता करत नाही; पण मला असं का होतय हे कळत नाही.’
तेव्हा डॉक्डरांनी सुनिलला मनोविकारतज्ञ सायकॅट्रीस्टकडे जाण्यासाठी सांगितले व सायकॅट्रीस्टनी सुनिलशी एकट्या बरोबर चर्चा केली व नंतर त्याच्या पालकांसोबत चर्चा करून सुनिलला मेज ड्रिपेसीव्ह डिसॉर्डर ‘नैराश्य’ आहे व त्याला उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे असे सांगितले.
जेव्हा पालकांनी उपचारासाठी अनुमती दिली तेव्हा डॉक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या व उपचार सुरू केल्यानंतर त्याची पाच सहा आठवड्यात बरीच चिडचिड कमी झाली व अभ्यासण करू लागला.
दीडवर्षामध्ये त्याला शाळेच्या परीक्षेत गुण देखील चांगले मिळू लागले व खेळ सुद्धा खेळू लागला व त्याच्या गोळ्यांचे डोसेस पण कमी झाले. अशा प्रकारे सुनिल नैराश्य म्हणजे मेजर डिप्रेशिव डिसॉर्डर ह्या आजारातून बाहेर पडला.
आता आपण ‘नैराश्य’ हया आजाराची दोन रुग्ण पाहिलीत तेव्हा असे लक्षात येते की, हा मानसिक आजार कधी सुरू होते हे रुग्णास किंवा नातेवाईकांना प्रथम लक्षात येत नाही.
पण जेव्हा मानसिक स्थिती खालावते व नेहमी उदास वाटते तेव्हा बरेचजण आयुष्यात घडणाऱ्या सध्याच्या गोष्टींवर किंवा इतरांच्या आपल्यासोबत वागणुकीवर बोट ठेऊन मला त्यामुळेच होत आहे असे समजतात.
जसे राधेचे अबॉर्शन झाले म्हणून; इतर कुणाचे व्यवसायात नुकसान झाले म्हणून तर कुणाचे परीक्षेत नापास झाले म्हणून असे समजून घेत रुग्ण व त्याचे नातेवाईक वाढणाऱ्या मानसिक स्थितीवर दुर्लक्ष करतात.
तर कधी कधी इतर नातेवाईक रुग्णास, “असा विचार करू नकोस तू जास्तच विचार करतोस”. असे सल्ले देतात व मग उदासिनता वाढत जावून रुग्ण आत्महतेचे पाऊल उचलतो.
लहान मुलांमध्ये त्याला काय होतय हे कळत नाही. त्यामुळे ते चिडचिड करतात. अशा वेळी पालक मारतात देखील. तेव्हा लहान मुलांच्या स्वभावात बदल होत असेल तर मनोविकारतज्ञांचा सल्ला घेण्यास काही हरकत नाही.
डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ञ
मन शांती हॉस्पिटल, पाथरी रोड परभणी