दंगल व्हावी हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न-मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप
आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत. राज्यात दंगल व्हावी हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. त्यांनी काल रात्रीच्या अंधारात आंतरवाली सराटीत पुन्हा लाठीचार्च करण्याचा डाव रचला होता. य पण आम्ही तो हाणून पाडला, असे ते म्हणालेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून कधी आंदोलन तर कधी उपोषणाचा मार्ग स्वीकारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रविवारी आंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता. त्यापाठोपाठ त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रकृती बिघडल्यामुळे ते आंतरवली सराटीमध्ये परतले. आज दुपारी त्यांनी बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.
देवेंद्र फडणवीसांवर केले होते गंभीर आरोप!
मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच, सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेचं पालन केलं जावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र, सरकारमधील सगळे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेत असून यामागेही त्यांचाच हात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस याचं स्वप्न होतं की,
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, याच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही काल आमच्यासाठी चक्रव्यूह रचला होता. रात्री पाच हजार महिला आणि 25 हजार पुरुष होते. देवेंद्र फडणवीस याचं स्वप्न होतं की, राज्यात पुन्हा दंगल व्हावी. परंतू आम्ही होऊ दिली नाही. पोलिसांनी काल आमच्या मराठ्यांवर लाठीचार्ज केला असता तर त्याला जर काही प्रत्युत्तर मराठा समाजाने दिले असते तर राज्य जळाले असते असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात. जरा विचार करुन पाहा. काल काय झाले असते. तुम्ही लपून बसला असता बंगल्यात. परंतू राज्य जळाले असते. याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विचार करणे गरजेचे आहे. राज्यभरातील नागरिकांनी देखील यावर विचार करावा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. फडणवीस तुम्ही सगे-सोयरेच्या नोटीफिकेशनची तातडीने अमलबजावणी करा, मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.
बेमुदत उपोषणाचं साखळी उपोषणात रुपांतर
“मी आजपर्यंत तगडी उपोषणं केली. या उपोषणाचा हा १७वा दिवस आहे. आता हे उपोषण स्थगित करतोय. याचं रुपांतर आता साखळी उपोषणात केलं आहे. रोज चार मुलं इथे उपोषणाला बसणार आहेत. राज्यभरातही मी आवाहन करतो की शांततेत सगळी साखळी उपोषणं करावी. मी केलेल्या तिन्ही उपोषणांमध्ये मी मराठा समाजाला न्याय मिळवून दिला आहे. एकही उपोषण वाया जाऊ दिलेलं नाही”, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं.