तुका म्हणे : भाग ४ : हव्यास

0 566

 

माकडे पकडण्यासाठी एका शिकाऱ्याने निमुळत्या तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले. ते काढण्यासाठी माकडाने भांड्यात हात घातला, मुठीत फुटाणे असल्यामुळे मूठ फुगली व ती माकडाला बाहेर काढता येईना. मूठ मोकळी करून हात बाहेर काढावा हे माकडाच्या ध्यानात येईना म्हणूनच तुकोबाराय म्हणतात

माकडे मुठिशी धरीले फुटाणे ! गुंतले ते नेणें हात तेथें !!१!!
काय तो तयाचा लेखावा अन्याय ! हित नेणें काय आपुले ते !!२!!

आपली ही अवस्था तुकोबारायांनी वर्णिलेल्या माकडाप्रमाणे होते. शिकाऱ्याने भांडे जंगलात ठेवले जेथे पोटभर खाण्या सारखे फळे असताना , काही फुटाण्याच्या हव्यासापोटी माकड अडकते. तसेच आपणही बऱ्याच ठिकाणी अडकतो व हव्यासापोटी बाहेरही पडत नाहीत. तर हा हव्यास कश्या-कश्याचा असेल बरं….

१) भौतिक सुखाचा हव्यास : माझा एक मित्र एका समारंभामध्ये भेटला, थोडी गर्मी होती. तो तसा जास्तच अस्वस्थ वाटत होता. थोड्या वेळाने म्हणाला , ही गर्मी असह्य होत आहे, मला नेहमी एसी ची सवय आहे, कसे जगतात लोक एसी शिवाय ?
तुकोबांच्या माकडाला हातून न सुटणाऱ्या फुटाण्यांपैकी एक म्हणजे भौतिक सुख. मनुष्यास जगण्यासाठी व वृद्धीसाठी आवश्यक त्या अत्यावश्यक गरजा जसे अन्न, पाणी, निवारा.. मनुष्य प्रगत होत गेला आणि वाढीस लागल्या त्या भौतिक गरजा . भौतिक गरजा माणसाचे जगणे आरामदायी (comfort) बनवतात , जसे असह्य गरमीमध्ये एसी ची थंड हवा. आरामाबरोबर आनंदाचा अनुभव म्हणजे सुख. नेहमी नेहमी सुखाचा अनुभव म्हणजे चैन व सातत्याने चैनीच्या उपभोगाणे चैनेची वस्तू ही गरजेची वाटणे म्हणजे चंगळ. माझ्या मित्राची एसी मध्ये बसणे ही सुविधा राहिलेली नव्हती तर ती आता गरज बनली होती. अश्याच आपल्या अनेक चैनीच्या गोष्टी गरच बनल्या आहेत, म्हणजेच आपण चंगळवादी बनत चाललो आहोत उदा. प्रत्येक रविवारी हॉटेलिंग केलीच पाहिजे, गाडी शिवाय मला जमतच नाही..
भौतिक सुविधा मिळवण्यापेक्षा आपण त्याचा हव्यास करायला लागतो. भौतिक सुविधा असणं ही एक जीवनशैली प्रमाणे आपण मान्य करत आहोत कारण अनेक जणांनी एखादी गोष्ट आत्मसात केल्यास भलेही ती चूक असो, ती बरोबरच असेल कारण सर्वच जन करत आहेत असे म्हणून आपण त्याची जीवनशैली बनवतो.
ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा उपभोग घेण्यापेक्षा ज्या गोष्टी अपणाकडे नाहीत त्या मिळवण्याच्या शर्यतीत धावू लागतो व एखादी गोष्ट न मिळाल्यास अनाठायी दुःखी होतो. त्यामुळेच मनुष्य जसजसा प्रगत होत आहे , तसतसा साम्राज्यवादी व चंगळवादी होत आहे.

२) नावाचा (प्रसिद्धीचा) हव्यास/ गर्व : आपण बऱ्याच वेळा नावासाठी काहीही करायला तयार असतो. प्रसिद्ध होण्याचे फुटाणे आपल्या हातून सुटत नाहीत व आपण दुःखी होतो. माझी पत कधीही खाली गेली नाही पाहिजे असा अट्टाहास करतो. एखादा मुलगा खेळताना थोडा जास्त मस्ती करायला लागला की आजकाल त्याची आई म्हणते आपल्या स्टेटस प्रमाणे राहायला शिका जरा, तो शेजारजा सोनू कसा स्टेटस नी राहतो पहा.
बऱ्याच वेळा हे नाव मिळवण्याच्या नादात आपण सुखी राहणेच विसरत आहोत. थोडे प्रसिद्ध नाव झाले की गर्व येत जातो , हे गर्वाचे फुटाणे ही हातातून सुटता सुटत नाहीत.
आपण जसे आहोत तसे वागणे सोडून कथाकथीत प्रतिष्ठित लोकांचे अनुकरण करत असतो. यामुळे समाजातील दिसणं , वैयक्तिक रूप ह्याला अतिमहत्त्व प्राप्त झाले आहे. मग सौंदर्याची व्याख्या , त्यावर होणार खर्च ही बदलत आहे. काही वेळा तर हे स्टेटस जपण्याच्या नादात , आपण अगदी जवळच्या माणसाच्या भावनांची ही पायमल्ली करत आहोत.

मग हा हव्यास कसा सोडू शकतो ? ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे ..भौतिक सूखापेक्षा भावनिक सुख मिळवणारे , मेळघाटात अनेक वर्षांपासून आदिवाशी लोकांची सेवा करणारे हे दांपत्य , ना भौतिक सुविधेचा अट्टाहास की ना प्रसिद्धीचा ..
मग भौतिक सुखाच्या मागेच लागू नये का ? तर भौतिक गोष्टींचा सुविधा म्हणून उपयोग नक्कीच करावा, परंतु त्यावरच सर्वस्वी विसंबून राहणे टाळावे. आवश्यक गोष्टींचा उपभोग घ्यावा , परंतु त्याची साठेबाजी करू नये, आजकाल मॉल मध्ये गेल्यावर किती अनावश्यक गोष्टी आपण घेऊन येतो हे तपासून पहा ना..भौतिक सुख व भावनिक सुख यांची योग्य सांगड घालावी. एखाद्या व्यक्तीला स्टेटस आयकॉन मानून , मीही पाहा बनतो का नाही तसाच, ह्या जीवनशैलीचा अट्टाहास टाळावा व मिळालेल्या गोष्टींचा आनंद घ्यावा.

सारांश :
तुकोबरायांना अपेक्षित मुठीत बांधलेले फुटाणे (हव्यास) :
१) पैशाला अतिमहत्व
२) भौतिक वस्तूंचा सुविधा म्हणून उपयोग न करता , त्यावरच विसंबून जाणे
३) आत्मकेंद्री जीवनशैलीतील भौतिक वस्तूंची साठेबाजी – माझ्याकडे सर्वंच वस्तू असाव्या म्हणून जमवाजमव
४) स्टेटस / पत नावाच्या गोष्टीला अतिमहत्व – ते वाढवण्यासाठीचा (एखाद्या व्यक्तीस स्टेटस आयकॉन समजून) अट्टाहास

मग हा हव्यास कसा टाळावा :
१) भौतिक सुखापेक्षा भावनिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करावा , कारण ते जास्त आनंददायी व दीर्घकालीन असते
२) भौतिक वस्तू सुविधेपुरत्या ठेवाव्या, त्याची चंगळ टाळावी
३) स्टेटस / पत नावाच्या भ्रामक कल्पनेपासून दूर राहावे
४) जे सध्या आपल्याकडे आहे त्याचा आनंद घ्यावा, जे मिळाले नाही त्यात अडकून अस्वस्थ होऊ नये
५) आत्मस्वीकर करणे / आत्मभान ठेवणे , जेणेकरून आपले व्यक्तित्व मोकळे ठेऊ

म्हणूनच तुकोबाराय म्हणतात

” माकडे मुठीशी धरीले फुटाणे ! गुंतले ते नेणें हात तेथें !!”

लेखक:
डॉ.जगदिश नाईक

मानसोपचार तज्ञ,परभणी

error: Content is protected !!