मुख्यमंत्री पदावरुन एकनाथ शिंदेचा मोठा निर्णय…म्हणाले..

0 124

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी कालच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी कालच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत आपला राजीनामा सुपूर्द केला होता. यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच का बोलत नाहीत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची बातमी समोर येत होती. तसेच एकनाथ शिंदे यांना सव्वा वर्ष तरी मुख्यमंत्रीपद हवं, अशी चर्चा सुरु होती. पण भाजपकडून ते मिळत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या सर्व चर्चांवर आणि याबाबतच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. आपण नाराज नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही महायुतीचे लोक आहोत. त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. वरिेष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य. आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे”, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं

मी जवळपास ८० ते ९० सभा घेतल्या

एकनाथ शिंदे म्हणाले मी जवळपास ८० ते ९० सभा घेतल्या. तसंच एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं. प्रवास तर पायाला भिंगरी लावून काम केलं. सीएम म्हणजे कॉमन मॅन ही माझी धारणा आहे. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना कुठलाही अडथळा येत नव्हता. महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे असं मला कायमच वाटत होतं. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे त्यामुळे मी सामान्यांच्या वेदना, काटकसर, तडजोडी सगळं पाहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) म्हटलं आहे. महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला. समाजातल्या सगळ्या घटकांसाठी आपण काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी म्हटलं आहे.

मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलंही मोजमाप व्हावं म्हणून मी काम केलं नाही. तर सरकार म्हणून काय देऊ शकतो ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो. दोन ते अडीच वर्षांत लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की कुठे घोडं अडलं आहे? मी मनमोकळेपणाने सांगतो आहे, मी काहीही ताणून धरलेलं नाही. मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केलं, जे निर्णय घेतले त्यामुळे झालं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण ते ओळखलं. मी समाधानी आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. मी नाराज वगैरे मुळीच नाही, रडणारे नाही तर लढणारे आहोत, लढून काम करणारे लोक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहिन असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे घेऊन गेलो. आनंद दिघे यांचे विचार घेऊन गेलो. आम्ही पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभे आहोत असं आम्हाला अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रिपद दिलं. मी त्या प्रत्येक दिवसाचा, क्षणाचा वापर राज्याच्या हितासाठी केला. मी मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. कारण त्यांचं पाठबळ लाभलं. या सगळ्या अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढला. मी अडीच वर्षांच्या माझ्या कालावधीत समाधानी आहेत. आमच्या सरकारमध्ये जे निर्णय झाले ते आजवर आम्ही जे निर्णय घेतले ते रेकॉर्डब्रेक आहेत. पत्रकार असोत, शेतकरी असो, लाडक्या बहिणी असोत सगळ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले. आमच्या काळात १२४ सिंचन प्रकल्प तयार झाले आहेत. या राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. कारण २३ नोव्हेंबरला जो निकाल लागला, त्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासह शिवसेनेचे नेते दादा भुसे, संजय शिरसाट आणि इतर नेते उपस्थित होते. एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता कायम होती. आता एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा २६ नोव्हेंबरला दिला आहे. त्यामुळे राज्यातली १४ वी विधानसभा बरखास्त झाली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.

error: Content is protected !!