निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पुढील भूमिका केली स्पष्ट…
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्यापूर्वी मतदानात्तोर चाचण्यांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार, युती किंवा आघाडीला अपक्ष किंवा लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांची जुळवाजुळवही करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
“जर उद्या VBA ला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहण्याचे निवडू.,” असं प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला असणार, हे उद्याच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात, त्यावरच अवलंबून असणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांचा भाव चांगलाच वधारला आहे. महायुतीने सत्ता स्थापन केल्यास आम्ही महायुतीला पाठिंबा देऊ, अशी उघड भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. आता, प्रकाश आंबेडकर यांनीही सत्ता स्थापनेसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
सरकार स्थापनेसाठी कुठल्याही एका पक्षाला बहुमता एवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना सत्तास्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांवर अवलंबून रहावे लागेल. भाजप व काँग्रेसला बाहेर ठेऊन इतर पक्षांनी एकत्रित येत महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याचा प्रयोग देखील होऊ शकतो. त्यामध्ये जुळवाजुळव करण्यात खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका महत्त्वाची असेल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.