स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. देवेंद्र भुसार यांच्यावर शेट्टी यांनी जोरदार टीकादेखील केली आहे.भुयार यांच्यावर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले, ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला. भुयार यांची पक्षातून हकालपट्टी होताच, त्यांनी धन्यवाद अशा आशयाची फेसबुक पोस्ट केली आहे. अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेच्या कुठल्याही आंदोलनात सहभागी होत नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे शेट्टी म्हणाले.
मंत्रीपद न मिळाल्याने भुयार नाराज
विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांचा विजय झाला होता. यावेळी भाजपचे नेते आणि कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार म्हणून देवेंद्र भुयार विजयी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र त्यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही. भुयार यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यात आणि पक्षातील वरीष्ठ फळीत खटके उडत होते.सध्याच वीज बील, कर्जमाफी संदर्भात महाविकास आघाडी विरोधात आंदोलन सुरू केले असता आमदार भुयार कोणत्याही व्यासपीठावर न दिसल्याने त्यांची हकापट्टी करण्यात आली आहे. याच काळात त्यांनी इतर पक्षांसोबत आपले संबंध वाढवले होते. तर स्वाभिमानी संघटनेला ते जुमानत नसल्याचे कार्यकर्त्याकडून सांगण्यात येत होते. म्हणूनच की काय हकालपट्टी होताच त्यांनी धन्यवाद अशी फेसबुक पोस्ट केली आहे.