अ‍ॅग्रीकॉस वर्गमित्रांचा खंडाळ्यात प्रथमच सहकुटुंब स्नेहमेळावा

सहकुटुंब जमले ७५ वर्गमित्र

0 0

परभणी – ‘जरा विसाऊ या वळणावर’ असा अर्थपूर्ण संदेश देणार्‍या बोधपूर्ण ओळीवर कडाक्याच्या थंडीतही उबदार मैत्रिची साद घालत अत्यंत उत्साहात येथील कृषि महाविद्यालयातील १९८८ बॅचच्या वर्गमित्रांचा सहकुटुंब स्नेहमेळावा खंडाळा येथे पार पडला. मुंबई-ठाणे स्थित आयोजक वर्गमित्रांनी प्रथमच सहकुटुंब स्नेहमेळावा घेतल्याने वयाच्या जवळपास ५५व्या वर्षीही ७५ वर्गमित्र सहकुटुंब सहभागी झाले. पंचतारांकीत सुविधासह आपुलकी, प्रेम-जिव्हाळ्याने कौटुंबीक ओळखी, जुन्या आठवणींना उजाळा, खोडकर किस्से, कुठल्याही स्तरावर मदतीची भावना, विशेष म्हणजे सुरेल सिनेगायनांसह दांपत्यांचे सपत्नीक बहारदार नृत्य हे या स्नेहमीलनाचे वैशिष्ट्ये ठरले.

१९८८ बॅचच्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी नाशिक, माकेगांव, परभणी, नांदेड, पैठण, अहिल्यानगर अशा ठिकाणी स्नेहमेळावे पार पडले. २०२४ चे गेटटुगेदर आयोजन करण्याची जबाबदारी मुंबईकर मिञांकडे सोपवली गेली. मुंबई-ठाणेस्थित सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकूने, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश बिराजदार, आंतरराष्ट्रीय कराधान विभागाचे आयकर आयुक्त संजय देशमुख, सहकार विभागाचे उपनिबंधक राजेंद्र गायकवाड, राज्य कर सहआयुक्त (वस्तू व सेवा) आप्पासाहेब गोर्डे, मंत्रालयातील सहसचिव संजय इंगळे, सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक सुनील कुलकर्णी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव विजय लहाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजयकुमार थोरात, जीएसटीचे सहाय्यक आयुक्त दीपक क्षीरसागर, बीएमसीच्या वृक्ष लागवाडचे अधीक्षक जितू परदेशी या वर्गमित्रासह त्यांच्या सुविद्य अर्धांगिनी अन्नू तांबोळी, वनिता अडकूने, सुमित्रा बिराजदार, प्रीती देशमुख, संगीता गायकवाड, अर्चना गोर्डे, शितल इंगळे, स्वाती कुलकर्णी, अरुंधती लहाने, अर्चना थोरात, उज्वला क्षीरसागर आणि रीना परदेशी यांचा उत्कृष्ठ आयोजनामध्ये अनमोल वाटा होता.

 

या सर्व आयोजकांनी अतिशय मेहनत घेऊन ‘जरा विसाऊ या वळणावर’ अ‍ॅग्रीकॉस-८८चा सहकुटुंब स्नेहमेळावा खंडाळा येथे उच्चदर्जाच्या पंचतारांकीत सुविधा देत आणि सर्व अतिशय सुंदर पद्धतीने यशस्वी पार पाडला. खंडाळ्याच्या गुलाबी थंडीत स्वप्नमय वाटावेत असे हे दोन दिवस होते. सुंदर सुबक आणि कलात्मक रेखाटलेली रांगोळी. रिसॉर्टच्या आवारात येताच सुहास्यवदनाने आपुलकीचे स्वागत, लगेच जेवणाचा आग्रह, सारं काही सुखावणार होते. कुटुंबाना राहण्यासाठी पंचतारांकित व्यवस्था, नाष्ट्या-जेवणामध्ये मेनूची रेलचेल. संध्याकाळी खास मुलांसाठी निवडलेला चायनीज नूडल्स सूप आणि पाव-भाजीचा खास बेत. दुसर्‍या दिवशी सकाळी रूचकर नाष्टा आणि आपल्या माणसांना परतीच्या प्रवासात त्रास नको म्हणून पिठलं-भाकरी, भरीत, ठेचा असा अस्सल गावरान बेत. सारं काही अप्रतिम. या सर्वाचा आनद घेण्यासाठी स्नेहाचा धागा जपत आणि साद अतूट मैत्रीची म्हणून आयोजकांच्या हाकेला प्रतिसाद देऊन शेकडो मैलांचा प्रवास करून एकूण ७५ कुटुंबे पाल्यासह सहभागी झाले होते. या स्नेह मेळाव्याच्या सुंदर क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य यावेळी सर्वांच्या पाल्यांना आणि सौभाग्यवतींना लाभले.

 

प्रारंभी बॅचमधील बारा मित्रांनी अकाली जगाचा निरोप घेतल्याने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत सर्व वर्गमित्रांनी त्यांच्या कुटुंबासमवेत परिचय तसेच दोघांनीही उखाणे घेवून नाव घेण्यासह आणि आयुष्यातील गोड आठवणींना उजाळा दिला. अर्चना आप्पासाहेब गोर्डे आणि तहसीलदार नरसिंग जाधव यांनी सुमधुर व नशीली आवाजात सिनेगीते सादर केली. अनिल कदम व त्यांची पत्नी अलका, जितेंद्र सोनटक्के आणि त्यांची पत्नी वैशाली, तसेच आयोजक युगूलानीही मनमोहक ठेका धरायला लावणारी बहरदार नृत्य सादर केली. दुसर्‍या दिवशी उत्कृष्ट सादरीकरण केलेल्यांना बक्षीसे देण्यात आली. अतिशय अप्रतिम असे सूत्रसंचालन पोलीस उपाधीक्षक असलेल्या गजानन भातलवंडे यांनी केले.

 

दरम्यान, सर्व सहभागींनी डीजेच्या तालावर मनमुराद नृत्यांचा आनंद लुटला. जाताना आयोजकांनी अतिशय मनमोहक प्रेमाची भेटवस्तू, सर्वांची माहिती असलेली रंगीत पुस्तिका सर्व सहभागींना दिली, तर दिवंगत मित्र बळवंत (बल्लू) धोंडगे यांच्या सुविद्य पत्नी सुनिता धोंडगे यांनी सर्वांना हस्तकलायुक्त गुलाब पुष्परूपी रुमाल सर्वाना भेट दिला. अतिशय प्रॅक्टिकल आणि ‘टेक्नोसेव्ही’असणारी पुढची पिढी म्हणजे सर्वांची मुले यांनाही या मेळाव्यात मैत्रिचे महत्व अनुभवता आले. या नव्या युगाच्या चकचकीत जगात महत्त्वाचं काहीतरी आपण हरवतोय आणि ते मिळवण्याची त्यांची झालेली मनाची तयारी दिसून आली. सच्चे दोस्त जर सोबत असतील तर अशक्य ते शक्यही होऊन जीवन सुसह्य होते. मित्रत्वाचं हे वैभव आपणही जपलं पाहिजे, वाढवल पाहिजे हा त्यांच्या मनात फुटलेला अंकुर हे या स्नेह मेळाव्याचं सर्वात मोठं साफल्य दिसून आले.

error: Content is protected !!