“चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील”; फडणवीसांचा कोणाला आहे सूचक इशारा
मुंबई – उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा पार पडेल. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपच्या नवनियुक्त आमदारांना सूचक सल्ला दिला.
गटनेते पदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपले महायुतीचे सरकार आहे. या सरकारमध्ये एकदिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं बहुमत असतं, त्यावेळी सगळ्या गोष्टी; सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत.”
“आपण एक मोठे उद्दिष्ट घेऊन आपण राजकारणात आलेलो आहोत. केवळ पदांकरिता, केवळ आपल्याला कुणीतरी मोठं करावं, याकरिता राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे, येत्या काळात चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, तर चार गोष्टी विरुद्ध देखील होतील. पण, तरीदेखील एका मोठ्या उद्दिष्टासाठी आपण एकत्रितपणे काम करू”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची इच्छा असलेल्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे मेसेज दिल्याची चर्चा यानंतर सुरू झाली.
राज्यपालांना भेटून करणार सत्तास्थापनेचा दावा
देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी हे भाजपचे दोन्ही निरीक्षक राजभवनावर शिष्टमंडळासोबत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या सूचक विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.