नमो सुधार योजनेअंतर्गत प्राचीन मंदिरे व बारवांना निधी जाहीर

सेलू तालुक्यातील वालुर येथील बारवेचा समावेश

0 71

सेलू / नारायण पाटील – नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील मंदिरे व गोकुळेश्वर मंदिर बारव,वालूर येथील हेलिकल स्टेपवेल व चतुरस्त्र बारव तसेच एरंडेश्वर ता.पूर्णा येथील सिद्धेश्वर मंदिर बारव यांचा समावेश करण्यात आला आहे. वालूरची प्रसिद्ध असलेली हेलिकल स्टेपवेल ही नुकतीच पोस्टाच्या टपाल तिकिटावर जाऊन आयकॉन बनलेली असून आता तिचा या नमो सुधार योजनेत समावेश झाल्याने सर्व जिल्हावासीय तसेच वालूर,चारठाणा येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून स्वकर्तृत्व आणि स्वतः हातामध्ये कुदळ फावडे घेऊन स्वच्छ केलेल्या या बारवा मोकळा श्वास घेत असून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांचे डिजिटलायझेशन व क्यू आर कोडींगसह पुनरुज्जीवन होणार असल्याने ही एक जिल्हावासीयांसाठी आनंदाची व गौरवाची बाब आहे.

 

 

या अभियानांतर्गत ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे,या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे.या मंदिर व बारवांचे डिजिटल दर्शन घडवणे तसेच परिसर सुशोभीकरण करणे व या ठिकाणांच्या स्वच्छतेबाबतची कामे केली जाणार आहेत. एकूण 73 स्थळांची निवड केली जाणार असून या सर्व ठिकाणांची माहिती क्यूआरकोडद्वारे दिली जाणार आहे. या ठिकाणी नकाशे लावण्यात येणार हे नकाशे डिजिटल सुद्धा करण्यात येणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता जिल्हा वार्षिक निधी 2023 -24, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व नियमित निधीद्वारे करण्यात येणार आहे.

 

 

परभणी जिल्ह्यातील वालूर येथील समस्त ग्रामस्थांनी कुदळ,फावडे,टोपले हातात घेऊन स्वच्छ व सुंदर केलेल्या व सध्या प्रसिद्ध असलेली हेलिकल स्टेपवेल व चतुरस्त्र बारव या दोन्ही बारवांचा यात समावेश आहे. चारठाणा येथील गोकुळेश्वर मंदिर व बारव, खुराची आई देवी मंदिर, महादेव मंदिर (जोड मंदिर) उकंडेश्वर मंदिरव गणपती मंदिर चारठाणा या प्राचीन मंदिरांचा यात समावेश आहे.पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील प्राचीन मंदिर म्हणून प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या बारावसुद्धा यात समाविष्ट करण्यात आली आहे.

error: Content is protected !!