सरकार देणार ‘या’ विद्यार्थ्यांना मोफत पासपोर्ट

0 106

हरियाणा सरकारने आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पासपोर्ट मोफत बनवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना पासपोर्ट बनवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहे. हरियाणा शालेय शिक्षण मंडळातून दहावी शिक्षण पूर्ण केलेले असावे, हरियाणा येथील कायमचा रहिवासी असावा आणि आयटीआय च्या संपूर्ण अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची उपस्थिती 80 टक्के असणे अपेक्षित आहे. या अटी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पासपोर्ट बनवला जाणार आहे.

 

आयटीआय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला बसण्यासाठी संस्थेकडून प्रवेश पत्र दिले जाणार आहे. हे प्रवेश पत्र विद्यार्थ्याला त्याच्या पासपोर्ट अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. हे पासपोर्ट विद्यार्थ्यांच्या आयटीआय संस्थेकडून मोफत बनवले जाणार आहे.

 

का राबवली जात आहे मोफत पासपोर्ट योजना?

मोफत पासपोर्ट योजना राबवण्यामागचा उद्देश कुशल विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या देशातच नव्हे तर परदेशात देखील नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे आहे. विद्यार्थ्यांना अनेकदा परदेशात करिअरच्या संधी आहेत असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या कौशल्याने परदेशात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जातात. विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ही योजना राबवली जात आहे.

गुडगाव सेक्टर 14 येथील गर्ल्स आयटीआयचे प्राचार्य जे पी यादव हे म्हणाले आहेत की आयटीआय चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परदेशात जायचे असेल तर त्याला कुठलीही अडचणी येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ही सुविधा देण्यात येत आहे. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येते ज्यामुळे अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतील. पासपोर्ट काढण्यासाठी लागणारा खर्च पंधराशे रुपये हा विभागाकडूनच दिला जाणार आहे. अंतिम परीक्षेच्या तीन महिन्या आधी पासपोर्ट साठीचा अर्ज भरणे आवश्यक आहे.

हरियाणा सरकारने दिलेली ही सुविधा हरियाणा येथील आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी आहे. विद्यार्थ्यांना पासपोर्ट काढण्यासारखे अवघड काम आता सहज होणार आहे.

error: Content is protected !!