ज्ञानोबा तुकोबांचा पालखी मार्ग हा भक्ती मार्ग म्हणून ओळखला जाणार : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
सहकार भारती चे अकरावे त्रैवार्षिक अधिवेशन आळंदीत संपन्न
आळंदी,दि 03 ः
श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणाऱ्या प्रमुख संतांच्या पालख्यां पैकी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी महामार्ग हा भक्ती मार्ग म्हणून ओळखला जाणारा असून येत्या पंधरा दिवसात या महामार्गाचे भूमिपूजन समारंभ पार पाडला जाणार आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे बोलताना सांगितले.
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे ११ वे त्रैवार्षिक अधिवेशन श्री क्षेत्र आळंदी येथे फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात संपन्न झाले असून अधिवेशनाचे उद्घाटन शनिवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, आमदार हरिभाऊ बागडे व राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या दोन दिवसीय अधिवेशनात सहकार चळवळीशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (२ ऑक्टोबर) जाहीर कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष व सहकार भारतीचे पहिले सरचिटणीस आमदार हरिभाऊ बागडे यांचा स्व.अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार देऊन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रोख रु. ५१ हजार, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते,यावेळी हरिभाऊ बागडे यांनी पुरस्कारात मिळालेली ५१ हजार रुपये रक्कम आणि स्वतःची ५१ हजार रुपये अशी रक्कम सहकार भारती कडे सुपूर्त केली.
यावेळी सहकार महर्षी ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे, पाटील आमदार महेश लांडगे,माजी मंत्री संजय भेगडे,आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंताताई उमरगेकर, डाॅ.उदयराव जोशी,पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे,सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. मुकुंद तापकीर, शिवशंकर लातुरे, महामंत्री विनय खटावकर, राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी, गणेश भेगडे, नगरसेविका सुनिता रंधवे, माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले पाटील, अशोक उमरगेकर, संजय घुंडरे, किरण येळवंडे, ज्ञानेश्वर बनसोडे, आकाश जोशी, भागवत काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शनिवार, दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात राज्याची सहकाराची सद्यस्थिती व शासनाच्या अपेक्षा या विषयावर सहकार आयुक्त अनिल कवडे हे मार्गदर्शन केले, सहकारातून समृध्दी या विषयावर सतीश मराठे यांनी अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले दुपारी २ वाजता सायबर सुरक्षा व सायबर क्राईम हा परिसंवाद झाला, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महिला बचतगट व सहकार या विषयावर अंबिका महिला औद्योगिक संस्थेच्या कमलताई परदेशी यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले तर फळे-भाज्या प्रक्रिया विषयासंदर्भात ज्येष्ठ सल्लागार संजय ओरपे व राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.