हवी कन्या एक गोड जगण्याची ओढ वाढविते- सुरेश हिवाळे
सेलू ( प्रतिनिधी )
प्रसन्नता सुख । घराचा आधार। आहे अलंकार संस्कारांचा।।, म्हणूनच हवी कन्या एक गोड। जगण्याची ओढ। वाढविते।। या सुरेश हिवाळे यांनी सादर केलेल्या अभंगाने रसिक भारावून गेले.
पत्रकार श्रीपाद कुलकर्णी यांचे आईवडील इंदुमती आणि भास्करराव कुलकर्णी मसलेकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या निमित्त शहरातील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात मंगळवार ( दि. २४ ) कवी संमेलन संपन्न झाले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी गौतम सूर्यवंशी हे होते. कवींनी सादर केलेल्या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कविता ऐकून कधी चेहऱ्यावर हास्य फुलले, तर कधी डोळ्यात नकळत पाणी तरळले. गझलकार संजय विटेकर यांनी ‘ बोलून टाक कळो ना कळो, पुढे आपले जुळो ना जुळो, आधीच जरा रडून घेतो, नंतर अश्रू ढळो ना ढळो. ‘ तर अश्विनी विटेकर यांनी ‘ तू जीवना कशाचा बदलाचं घेत आहे,
मी मागते सुखाला तू दुःख देत आहे. ‘ ही गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. मनिषा पांडे यांच्या ‘ छोट्या मोठ्या असंख्य रेषा, तळहातावर किती, कुठली नाही मनासारखी, ओंजळ माझी रिती ‘ या कवितेने रसिक भारावून गेले. चंद्रकांत कुलकर्णी मसलेकर यांनी ‘कालच महिला दिन झाला, आमच्या ह्यांला अजिबात सवड नव्हती
महिला सबलीकरणावर फार छान बोलतात हे, दिवसभर मी ह्यांच्यासोबतच होते. ‘ सादर केलेल्या या कवितेने रसिकांना खिळवून ठेवले. करूणा बागले यांनी ‘ माझ्या मराठीचा रंग, असे गहिरा गहिरा, ज्ञानेशाच्या ज्ञानाईत, वाहे अमृताचा झरा. ‘ ही मराठीची महती सांगणारी कविता सादर केली. तर संध्या फुलपगार यांनी आपल्या ‘ काळजाची वेदना, कळवळू लागली , तेव्हा कुठे कविता, दरवळू लागली ‘ या कवितेने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी गौतम सूर्यवंशी यांची ‘ आकाशाचा मी कंदील होतो , पणतीसम तूज कवेत घेतो, घेता घेता कवेत तुजला, मीच पुरता उजळून जातो ‘ ही कविता श्रोत्यांना भावली. कवी संमेलनास प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, अतुल दातार, प्रा. प्रकाश कुरूंदकर, प्रा. अनिल कुलकर्णी, दिलीप डासाळकर यांची उपस्थिती होती. कवी संमेलनाचे सुत्रसंचलन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीपाद कुलकर्णी मसलेकर यांनी केले.