भाजप खासदाराच्या डोक्याला जबर मार, राहुल गांधींवर आरोप
दिल्ली : भाजप खासदारांनी संसदेत काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत निदर्शने केली. यावेळी “राहुल गांधींनी एका खासदाराला धक्काबुक्की केली जो, माझ्यावर पडला ज्यामुळे मी खाली पडलो आणि माझ्या डोक्याला दुखापत झाली” असा गंभीर आरोप भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी राहुल गांधींवर केला आहे.
याशिवाय, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांना संसदेच्या मकर गेटवर भाजपच्या खासदारांनी धक्काबुक्की केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
प्रताप सारंगी यांच्या आरोपावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, “हो, मी केलय, ठीक आहे. धक्का-बुक्कीने काही होत नाही. मला संसदेच्या आता जायचं होतं. संसदेत जाणं माझा अधिकार आहे. मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. मला संसदेत आत जाण्यापासून रोखण्यात आलं. भाजप खासदार धक्का बुक्की करत होते”
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले की, “हे संसदेच प्रवेशद्वार आहे. भाजपचे खासदार मला ढकलत होते. धमकावत होते. भाजप खासदारांनी प्रवेशद्वार रोखून धरलं होतं. ते मला सतत ढकलत होते, धमकावत होते”
प्रतापचंद्र सारंगींनी केला गंभीर आरोप
भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी म्हणाले, “मी पायऱ्यांजवळ उभा असताना राहुल गांधी आले आणि माझ्यावर पडलेल्या खासदाराला राहुल गांधींनी धक्का दिला आणि त्यानंतर मी खाली पडलो. ” याचदरम्यान प्रताप सारंगी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. फरुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल गांधींवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
माणिकम टागोर यांचा खुलासा
“भाजपचे लोक नाटक करत आहेत. या घटनेबाबत आम्ही लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहोत. या घटनेपूर्वी
राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या नेतृत्वाखाली भारत आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या संकुलातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध मोर्चा काढला होता.” असं वक्तव्य काँग्रेसचे खासदार बी. माणिकम टागोर यांनी केलं.