अपघात नेमका कसा झाला? घटनाक्रम सांगत पोलीस म्हणाले….

0 30

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर देशभरातून या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला? पहाटेच्यावेळी झालेल्या या अपघाताचा घटनाक्रम काय होता याविषयी अनेक तर्कतवितर्क लावले जात आहेत. अशातच पोलिसांनी या अपघाताचा घटनाक्रम सांगत माहिती दिली. पोलिसांनी शनिवारी (१ जुलै) बुलढाण्यात पत्रकारांना माहिती दिली.

पोलीस म्हणाले, “पहाटे १.३५ वाजल्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला. ही बस आधी समृद्धी महामार्गावरील वीजेच्या खांबाला धडकली. धडकेनंतर बस पुढे आल्यावर डिझेल टँक दुभाजकाला लागला. यामुळे डिझेल टँक फुटला. पुढे बस दुभाजकाला घासत गेली आणि त्यामुळे बस उलटी होऊन आग लागली.”

बसच्या काचा फोडून बाहेर आलेल्या ८ प्रवाशांचा प्राण वाचला”

“या बसमध्ये एकूण ३३ लोक होते. मॅनिफेस्टमध्ये २६-२७ लोक होते. काही प्रवासी रस्त्यात येताना घेतले असतील. यापैकी बसच्या काचा फोडून बाहेर पडता आलं अशा ८ प्रवाशांचा प्राण वाचला आहे. त्यात २५ वर्षीय चालकाचाही समावेश आहे. चो दारव्याचा असून शेख दानिश शेख इस्माईल असं या चालकाचं नाव आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

“बसमध्ये दोन चालक, एकाचा मृत्यू”

“बसमध्ये दोन चालक होते आणि एक क्लिनर होता. यापैकी एका चालकाचा मृत्यू झाला आहे. जो चालक बस चालवत होता तो सुखरुप आहे. आतापर्यंत पोलिसांनी २५ मृतदेह बुलढाण्याला पाठवले आहेत,” असंही पोलिसांनी नमूद केलं.

नेमकं काय घडलं?

प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून उलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.

error: Content is protected !!