उपमुख्यमंत्रिपद दिल्यास ते स्वीकारा..शिवसेनेच्या नेत्यांचा एकनाथ शिंदेना आग्रह
सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी तो अंतिम असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी काल मांडली. दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपनं उपमुख्यमंत्रिपद दिल्यास ते स्वीकारा, अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंनी घातली.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजपच्या नेतृत्त्वावर सोपवला आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपद होण्यास फारसे उत्सुक नाहीत. सत्तेबाहेर राहून पक्ष सांभाळायचा असा विचार त्यांच्याकडून सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे सत्तेत सहभागी न होता पक्ष चालवायचा असा त्यांचा मानस आहे. पण शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावं, असा शिवसेनेच्या आमदारांचा, माजी मंत्र्यांचा आग्रह आहे.एकनाथ शिंदेंनी काल त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही सरकारमध्ये या, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, अशी मागणी त्यांनी शिंदे यांच्याकडे केली. सत्तेबाहेर राहून नव्हे, तर सत्तेत सहभागी होऊन सरकार चालवा, असा आग्रह नेत्यांनी शिंदेंकडे धरला. माजी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, आमदार संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी शिंदेंशी चर्चा केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीला जाण्यापूर्वीही शिवसेनेचे नेते त्यांच्या भेटीला पोहोचले. ‘तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आहेत. तुम्ही आम्हाला सत्तेत हवे आहात. केवळ पक्षप्रमुख म्हणून काम न करता तुम्ही सत्तेत सहभागी व्हा. उपमुख्यमंत्रिपद मिळत असल्यास ते स्वीकारा. सरकारमध्ये चांगल्या पदावर काम करा. तुम्ही मंत्रिमंडळात असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे,’ अशी भूमिका नेत्यांनी शिंदेंकडे मांडली.