सेलू / प्रतिनिधी – शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढून विद्यार्थ्यांचे डिजिलॉकर काढण्याची मोहीम सुरू केली आहे.अपार आयडी काढण्याची संकल्पना जरी चांगली असली तरी त्यातील निर्माण होणाऱ्या अडचणींकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.आधीच अपार आयडी काढण्यात शिक्षकांना ” अपार ” मेहनत घ्यावी लागत असतांना आता शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षकांनी अपार आयडी पूर्ण करा अन्यथा वेतन देयक स्वीकारले जाणार नाही असे आदेश काढल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांमधून मात्र नाराजीचा सूर उमटत आहे.
अपार आयडी काढण्यात “अपार”अडचणी आहेत.अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाहीत,अनेकांच्या नावात बदल आहे,जन्म तारखेत सुद्धा बदल आहेत.तसेच काहीवेळा साईट सुद्धा कमी गतीने चालत असल्याने शिक्षकांना रात्री उशिरा सुद्धा ऑनलाइन बसून कामे करावी लागत आहेत.युडायस वरील विद्यार्थ्यांची नावे व आधार कार्ड वरील नावे यात तफावत असल्याने विद्यार्थ्यांनी आधारकार्ड अपडेट केल्यावरच अपार आयडी काढता येतो.तसेच आधारकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया शाळा स्तरावर होत नाही.पालक जेव्हा आधारकार्ड अपडेट करतील तेव्हाच शाळांना अपार आयडी काढता येईल.पालक देखील आधारकार्ड अपडेट करण्यात दिरंगाई करत आहेत.आधार केंद्रावर देखील अपडेट करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.सर्व शिक्षक ,मुख्याध्यापक या अपार आयडी बाबत कामे करत आहेत परंतु यामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे शिक्षक मंडळी हतबल झाली आहेत.कारण आधार कार्ड अपडेट करण्यात पालक उशीर करतात किंवा अपडेट केल्यानंतर आधारकार्ड अपडेट होण्यास काही दिवसांचा कालावधी द्यावा लागतो.अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतांना आता शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक प्राथमिक यांनी अपार आयडीचे काम 40 टक्के अपूर्ण असून हे काम पूर्ण करून तसा अहवाल दिल्यानंतरच डिसेंम्बर चे वेतन देयक स्वीकारले जाईल अन्यथा स्वीकारले जाणार नाही असे पत्र 13 डिसेंम्बर रोजी काढल्याने मात्र नाराजी व्यक्त होत आहे.हीच परिस्थिती माध्यमिक विभागाची सुद्धा आहे.आता काम करूनही अपार आयडी मध्ये अनेक अडचणी येत असल्याने यामध्ये शिक्षकांचा काय दोष ? असा प्रश्न निर्माण होत आहे.