अधिवेशनाचा पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर ही योजना बंद होणार? अशी टीका विरोध पक्ष करत आहे. योजनेतून दहा लाख महिलांना वगळले, असा आरोप केला जात आहे. त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यात ही योजना बंद होणार नाही, असे रोखठोकपणे त्यांनी सांगितले. तसेच महिलांची संख्या कमी का झाली? त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री काय म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही. हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही. या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील. पंरतु नियमाच्या बाहेर जे आहेत, त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे. कारण ‘कॅग’ने त्याबाबत आपल्यावर टाकले बंधन आहे. त्यानुसार, पात्र लोकांनाच कोणत्याही योजनेची मदत करता येते. अपात्र लोकांना मदत करता येणार नाही. त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. विरोधकांचा आरोप चुकीचा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेचे पैसे २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते. सध्या या योजनेत १५०० रुपये महिना पात्र महिलांना दिला जातो. आता २१०० रुपये करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते.