नागपुरातच भाजपला जबरदस्त धक्का, शिक्षक मतदारसंघात नागो गाणार पराभूत
विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी पार पडली. नागपूरमध्ये भाजप समर्थित नागो गाणार आणि मविआ पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात लढत झाली. नागो गाणार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते गेल्या दोन टर्म या मतदारसंघाचे आमदार होते. तिसऱ्या वेळी विजय मिळवून हॅट्रिक करण्याची त्यांची संधी हुकली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून भाजपच्या समर्थनावर नागो गाणार यांनी निवडणूक लढवली होती. पण, अँटीइन्कबन्सीचा त्यांना फटका बसला. पहिल्या फेरी अखेर सुधाकर अडबाले यांना १४०६९ मतं मिळाली तर नागो गाणार यांना ६३६६ मतं मिळाली होती. अडबाले यांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
सुधाकर अडबाले हे चंद्रपूरचे असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून त्यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसनं सुधाकर अडबाले यांना वर्षभरापूर्वीच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मविआच्या बैठकीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला होता. नाशिकमध्ये सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज न दाखल केल्यानं मतदारसंघांची अदलाबदली करण्यात आली. यामध्ये सेनेनं नागपूरच्या जागेवरुन उमेदवार मागं घेतला. मविआनं सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला.