एचएआरसी संस्था आयोजित शैक्षणिक पालकत्व उपक्रमास सुरुवात
101 वंचित, अनाथ बालकांना शैक्षणिक किटचे वाटप करणार
परभणी,दि 01 ः
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील अनाथ दुर्धर आजारग्रस्त व एकल पालक बालके शिक्षणापासून अर्थात शैक्षणिक गरजांपासून वंचित राहू नये म्हणून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थे तर्फे परभणी जिल्ह्यातील 101 वंचित बालकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शैक्षणिक किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
दि 1 ते 15 जुलै दरम्यान विविध टप्यात ग्रामीण भागात स्वतः जाऊन विविध तांडे वस्ती, जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी भेट देऊन अनाथ, एकल पालक व वंचित बालकांना शैक्षणिक किट चे वाटप करण्यात येणार आहे.
या शैक्षणिक किट मध्ये स्कुल बॅग, 9, 10 वी च्या मुलांना पाठ्यपुस्तके, वर्षभर पुरतील इतके 12 रजिस्टर, नोटबुक, चित्रकला साहित्य, पेन, स्टेशनरी, कंपास बॉक्स आदींचा समावेश असणार आहे.
आज डॉक्टर्स डे निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन बालरोगतज्ज्ञ डॉ राजगोपाल कालानी व डॉ जयश्री कालानी यांच्या हस्ते तर एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, राजेश्वर वासलवार, नेहा मुरक्या, ऍड अनुराधा गायकवाड यांच्या उपस्थितीत मराठवाडा प्लॉट, खंडोबा बाजार परिसरातील 11 दुर्धर आजारग्रस्त, एकल पालक व वंचित बालकांना शैक्षणिक किट चे वाटप करून करण्यात आले.
पुढील आठवड्यात ग्रामीण भागातील 90 मुलांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून आयोजन: “एचएआरसी संस्थेने सोशल मीडिया वर समाजातील वंचित, दुर्धर आजारग्रस्त व वंचित बालकांना शैक्षणिक किट चे वाटप करण्यासाठी 1100/- प्रति विद्यार्थी प्रमाणे 150 शैक्षणिक किट साठी मदतीचे आवाहन केले आहे. तरी आपापल्या परीने या उपक्रमात सहयोग द्यावा” असे आवाहन एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी केले आहे.